मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना चालना देण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यात २४ विविध विकासकामांना सुमारे ११५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पात या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून होणारी ही विकासकामे मुख्यमंत्र्यांना जाणीवपूर्वक विकासकामात अडथळे आणणाऱ्या मंडळींच्याच विभागातील असून, पृथ्वीराजबाबांनी केवळ जनहित व नागरी सुविधांनाच प्राधान्य दिले आहे. या कामांचे प्रस्ताव सादर करीत निधी मंजुरीसाठी आपण कसोशीने प्रयत्न केले असल्याची माहिती काँग्रेसचे युवा नेते राहुल चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राहुल चव्हाण म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी देऊ केलेल्या निधीमध्ये कराडमधील जुन्या आणि ऐतिहासिक कोयना पुलाचे रूपडे बदलणार असून, या ब्रिटिशकालीन पुलाच्या दुरूस्तीसाठी ४ कोटींचा निधी मंजूर आहे. कराडनजीकच्या सैदापूर ते बनवडीफाटा रस्त्याचे १० मीटर वरून १७.५ मीटर असे चौपदरीकरण होत आहे. या २ किलोमीटरच्या चौपदरीकरणास ६ कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. कृष्णा पूल (सैदापूर) ते ओगलेवाडी या ४ किलोमीटर अंतराचा महत्त्वपूर्ण रस्ताही १० मीटरवरून १७.५ मीटर होणार असून, त्यासाठी १९.५० कोटी रूपयांच्या निधीस मान्यता मिळाली आहे. सुपने ते किरपे मार्गावरील कोयना पुलासाठी १३ कोटी २० लाखांचा निधी मंजूर असून, हा २१० मीटर लांबीचा पूल अद्ययावत होणार असल्याचे राहुल चव्हाण यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी आपली कर्मभूमी असलेल्या पाटण तालुक्यासाठीही भरीव निधीची तरतूद कायम ठेवली असून, ४ विकासकामांना तब्बल २२ कोटींचा निधी दिला आहे. महिंद,  कुसरूंड, नाटोशी या ५ किलोमीटर अंतराच्या रस्ता सुसज्जीकरणासाठी अडीच कोटी रूपये मंजूर असून, हा ढेबेवाडी, कुंभारगाव विभागातील जनतेला पाटण शहराकडे जाण्यासाठी कमी अंतराचा मार्ग उपलब्ध होणार आहे. या मार्गादरम्यान असलेल्या असवलेवाडी, भालेकरवाडी, कळकेवाडी, रवले, उदवणे, पांढरपाणी या डोंगरी वाडय़ा, वस्त्या व गावांना विकासाचे बळ मिळणार आहे. कोयना नदीच्या पुरात कायम पाण्याखाली जाऊन ३५ वाडय़ा, वस्त्यांचा संपर्क तुटत असलेल्या संगमनगर धक्का पुलाची उंचीही आता वाढणार असून, २० वर्षांपासून मागणी असलेल्या या १८० मीटर लांबीच्या पुलासाठी १२ कोटी ५१ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. दरम्यान, लेंडोरी, मणेरी, तळीये आदी गावातील ग्रामस्थांनी हा पूल मणेर (गौंड) ते मणेर असा होण्यासाठी प्रस्ताव दिला असून, तो मुख्यमंत्र्यांच्या विचाराधीन असल्याचे राहुल चव्हाण यांनी स्पष्ट केले.  
गुढेफाटा ते कुठरे, धामणी, काळगाव मार्गे आचरेवाडी या साडेतेरा किलोमीटरच्या रस्ता रूंदीकरणास मंजुरी मिळाली असून, प्रदीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या कामासाठी साडेसहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या कामी वरील सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी व सदस्यांनी निवेदनाद्वारे राहुल चव्हाण यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार गुढेफाटा ते आचरेवाडी या मार्गाचे रूंदीकरण होत आहे.  कुंभारगाव येथील लक्ष्मी हायस्कूल जवळच्या पुलासाठी ५६ लाख रूपयांची तरतूद मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
याचबरोबर सातारा तालुक्यातील सातारा ते पंढरपूर मार्गे मोहोळ या १४१ किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ७ कोटी २० लाख, सातारा तालुक्यातील सातारा  ते रहिमतपूरमार्गे विटा या रस्त्यावरील सातारा शहरातून जाणाऱ्या मार्गाच्या चौपदरीकरणासाठी १९ कोटी ८० लाख, खंडाळा तालुक्यातील खंडाळा ते अहिरेमार्गे लोणंद या मार्गाच्या रूंदीकरणासाठी ६ कोटी १२ लाख, फलटण तालुक्यातील फलटण ते कुळकजाई मार्गावरील येळोशी ते कुळकजाई या ८.२० किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या सुसज्जीकरणासाठी ७ कोटी, माण तालुक्यातील शेरेवाडी  ते  बिदाल या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ७५ लाख, फलटण ते शिंगणापूर मार्गे शेणवडी रस्त्यावरील मोहिते माडी अशा डांबरीकरणास ६० लाख, तर याच मार्गावरील वरकुटे ते म्हसवड अशा डांबरीकरणासाठी ६० लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. याचबरोबर विविध १० विकासकामांनाही भरीव निधी उपलब्ध झाला असल्याचे सांगताना, मुख्यमंत्र्यांनी सुचवलेली आणि विशेष लक्ष घालून मंजूर झालेली ही कामे असून, यासंदर्भात श्रेयवादाचे कोणी राजकारण करू नये, असे आवाहन राहुल चव्हाण यांनी केले आहे.