वाढत्या उष्म्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीचा प्रचारही तापू लागला असताना जिल्ह्यातील ग्रामीण भाग मात्र अजूनही निवडणूक प्रचाराच्या भपक्यापासून दूरच आहे. एरवी लोकसभा किंवा विधासभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा उडणारा धुराळा यावेळी अजून दिसून येत नाही. त्यामुळे ग्रामीण मतदारांच्या मानसिकतेचा अंदाज घेणे राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना कठीण जात आहे.
जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील शहरी भागात प्रचार आता चांगलाच वेग घेऊ लागला आहे. आपआपल्या पक्षाचे चिन्ह असलेली वाहने शहरातील रस्त्या-रस्त्यांवर फिरू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर पंचवटी, जुने नाशिक आणि नाशिकरोड भागात भव्य प्रमाणात प्रचार फेऱ्याही काढण्यात आल्या. याव्यतिरिक्त इतर उमेदवारांकडून त्या त्या भागातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचार फेऱ्या काढण्यात येत असल्याने आणि त्यांच्याकडून करण्यात येणाऱ्या घोषणाबाजीमुळे वातावरण निवडणूकमय होऊ लागले आहे.
किमान प्रचाराचा भपका जाणवू लागला आहे. त्यातच दुसऱ्या फळीतील काही नेत्यांच्या सभाही शहरांमध्ये झाल्याने प्रचाराला रंगत येऊ लागली असताना ग्रामीण भाग मात्र त्यापासून अजूनही वंचितच आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कुठेच भपकेबाज प्रचार दिसत नाही. अपवादत्मकरित्या प्रचाराचे एखादे वाहन गावात जाताना दिसते. ते वाहन निघून गेल्यानंतर पुन्हा सर्व काही शांत. मधूनच एखादा उमेदवार आपल्या निवडक सहकाऱ्यांसह गावात धडकतो. समाजमंदिर किंवा पारावरच छोटेखानी सभा घेऊन मतदान करण्याचे आवाहन करतो. या छोटेखानी सभांसाठी ध्वनिक्षेपकाची व्यवस्था नसते. समोर उपस्थित गर्दीही जेमतेम १००-२०० पर्यंतच मर्यादित. एरवी गावागावांमध्ये सातत्याने येणाऱ्या प्रचाराच्या वाहनांमुळे आणि दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या मनोरंजक घोषणांमुळे निवडणुकीच्या नातावरणाचा अगदी लहानांपासून मोठय़ांपर्यंत आनंद लुटला जात असे. ते दृश्य सध्या कुठेच दिसत नाही. आचारसंहितेच्या कठोर अंमलबजावणीमुळे पैसा खर्च करण्यावर येणारे र्निबध त्यासाठी कारणीभूत ठरत आहे.