निकृष्ट दर्जाचे अन्न, अस्वच्छता, मोडकळीला आलेली जिने, गळके छप्पर अशी अवस्था असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच्या वसतिगृहांमध्ये त्या दृष्टीने सुधारणा करण्याऐवजी अग्निप्रतिबंधक उपकरणे, सोलर वॉटर हिटर सयंत्रे अशा खर्चिक आणि विद्यार्थ्यांना फारशा उपयोगी न पडणाऱ्या यंत्रणा बसविण्याकडे समाजकल्याण विभागाचा कल असल्याने येथील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
वरळीच्या वसतीगृहांसाठी २०११ मध्ये सोलर वॉटर हिटर सयंत्रे बसविण्याची योजना होती. मात्र, अनेक वर्षे ही यंत्रणा येथे धूळ खात पडून आहे. कारण, या सयंत्रांचे वजन वसतिगृहाची जुनी इमारत पेलू शकत नाही. तीच अवस्था अग्निप्रतिबंधक उपकरणांची. या वर्षी समाजकल्याण विभागाने अर्थसंकल्पात राज्यभरातील २७१ विद्यार्थी वसतिगृहांमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्यासाठी आर्थिक तरतूद केली. त्यानुसार, प्रत्येकी १,५२५ रुपये याप्रमाणे ९,६९० अग्निशमन यंत्रांची खरेदी करण्यात आली. त्यासाठी एक कोटी ४७ लाख ७७ हजार २५० रुपये खर्च करण्यात आले. त्यापैकी मुंबई शहरातील वसतिगृहांसाठी खरेदी करण्यात आलेल्या ५१ यंत्रांवर ७७,७७५ रुपये खर्च करण्यात आले. उपनगरासाठी ६० यंत्रांकरिता १,०३,७०० रुपये खर्चण्यात आले. पण, दोन वर्षांपासून मुंबईतील बहुतांश वसतिगृहांमधील अग्निशमन यंत्रणा गोदामात कधी धूळ खात पडून होती. त्यावर ‘लोकसत्ता’ने एका वृत्ताद्वारे प्रकाश टाकल्यानंतर त्यानंतर गेल्याच आठवडय़ात वसतिगृहांमध्येही ही उपकरणे बसविण्यात आली. मात्र, एकेका वसतिगृहात बसविण्यात आलेल्या मजल्यावर आठ ते नऊ अशी नको इतकी सयंत्रे बसविण्यात आली आहेत. वसतिगृहांची दुरवस्था सुधारण्याऐवजी नको त्या बाबींवर खर्च करून सरकारी पैशाचा अपव्यय केला जात आहे, अशी तक्रार एका विद्यार्थ्यांने केली. कारण, मुंबईसह राज्यभरात सर्वत्र समाजकल्याण विभागातर्फे मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता बांधण्यात आलेल्या वसतिगृहांची दुरवस्था झाली आहे. मुंबईत वरळी, चेंबूर, घाटकोपर या ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची सोय आहे. या सर्वच वसतिगृहांमध्ये निकृष्ट दर्जाचे अन्न मिळते म्हणून विद्यार्थ्यांची ओरड असते. स्वच्छता, नीटनेटकेपणा तर सोडूनच द्या पण या वसतिगृहांमध्ये सुरक्षेची वानवा आहे. देखभालीअभावी या वसतिगृहांच्या इमारतींचीही दुरवस्था झाली आहे. बहुतेक वसतिगृहांच्या इमारतींमधील दरवाजे, भिंती, जिने मोडकळीला आले आहेत.
या प्रकारच्या महागडय़ा यंत्रणांच्या खरेदीमध्ये पैसे खाण्यास खूप वाव असतो. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या नको  गोष्टींवर खर्च करून गरजेपेक्षा जास्त अग्निप्रतिबंधक उपकरणे लावून गोदामात धूळ खात पडलेली अग्निप्रतिबंधक उपकरणे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहांमध्ये आठवडाभरापूर्वी लावण्यात आली. पण एकेका मजल्यावर गरजेपेक्षा जास्त उपकरणे लावण्यात आल्याने ही उपकरणे नेमकी विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी आहेत की त्यांच्या भरमसाठ खरेदीवर कुणा भलत्यालाच मलिदा मिळावा म्हणून विनाकारण खरेदी खाल्ला असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो आहे. एकेका मजल्यावर सात ते आठ इतकी नको त्या संख्येने उपकरणे लावण्यात आल्याने ही यंत्रणा नेमकी विद्यार्थ्यांच्या फायद्याची आहे की आणखी कुणाच्या, असा सवाल प्रहार या विद्यार्थी संघटनेचे मनोज टेकाडे यांनी केला.