वाळू माफियांच्या विरोधात बेधडक कारवाई करणाऱ्या विद्याचरण कडवकर यांच्यावर अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींची पोलिसांना ओळख पटली आहे. त्यांना पकडण्यासाठी दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत. यवतमाळ जिल्ह्य़ात बेलुरा गावातील हे आरोपी असून त्यांना लवकरात लवकर पकडले जाईल, असे पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांना सांगितले.
वाळू माफियांविरुद्ध महसूल प्रशासनही कडवकरांच्या पाठिशी उभे असून असे कृत्य करणाऱ्या वाळू माफियांवर पुढील काळात विशेष नजर ठेवली जाईल, असे आज सांगण्यात आले. जो ट्रॅक्टर कडवकर यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला गेला, त्याच्या क्रमांकावरून पोलिसांनी वाळू माफियाला शोधले आहे. मात्र, आरोपी पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांची नावे सांगण्यास नकार दिला. यवतमाळ जिल्ह्य़ाच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टरच्या क्रमांकावरून ते कोणाच्या मालकीचे आहेत, याची माहिती पोलिसांना दिली आहे. त्या आधारे तपास सुरू असून आरोपी बेलुरा गावात असतील अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. तेथे छापाही टाकण्यात आला. मात्र तेथे आरोपी सापडले नाहीत.
हिंगोली जिल्ह्य़ाचा पदभार स्वीकारल्यानंतर तहसीलदार कडवकर यांच्या कार्यकाळात वाळू लिलावातून दुप्पट महसूल वसूल झाला. घोटादेवी, सिरसम, समगा येथील वाळू घाटावरून रेती चोरणाऱ्या माफियांच्या विरोधात त्यांनी यापूर्वीही कारवाई केली होती. दंडात्मक कारवाई झाल्याने वाळू माफियांनी त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र ते दबावाला बळी पडले नाहीत. हिंगोली तालुक्यात २८ वाळू घाट आहेत, त्यापैकी १६ वाळूघाटांचा लिलाव होऊन २९ लाख ६५ हजार रुपये मिळाले होते. या वर्षी १३ वाळू घाटांच्या लिलावातून ६४ लाख २२ हजार रुपयांचा महसूल मिळाला, तसेच दंडात्मक कारवाई केल्याने महसुलात ४ लाखांची भर पडली. दरम्यान या प्रकरणानंतर पालकमंत्री वर्षां गायकवाड यांनी आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या असून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या पाठिशी असल्याचे कळविले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Aug 2013 रोजी प्रकाशित
यवतमाळ जिल्ह्य़ातील हल्लेखोरांना पकडण्यासाठी दोन पथके
वाळू माफियांच्या विरोधात बेधडक कारवाई करणाऱ्या विद्याचरण कडवकर यांच्यावर अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींची पोलिसांना ओळख पटली आहे. त्यांना पकडण्यासाठी दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत.
First published on: 12-08-2013 at 01:57 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sand mafia case in hingoli