जुजबी कारवाईचे वठविले नाटक
गंगाखेड, पालम तालुक्यात वाळूची मोठय़ा प्रमाणात तस्करी होत असताना स्वस्थ बसलेल्या प्रशासनाने अखेर अवैध वाळूवाहतूक करणारी एक तरी मालमोटार पकडण्याची कारवाई केली. रविवारी रात्री महसूल पथकाने ही मालमोटार पकडून १२ हजार ८०० रुपये दंड वसूल केला.
गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळूउपसा मोठय़ा प्रमाणात होत आहे. जिल्ह्यातून लातूर, बीड जिल्ह्यांतही मोठय़ा प्रमाणात वाळू नेली जात आहे. ठेकेदारांकडे वाळूउपशाची अद्ययावत यंत्रणा आहे. त्यामुळे पाणीसाठा असलेल्या पात्रातही वाळू उपसणे आता अवघड नाही. पालम, गंगाखेड तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी होणारा वाळूउपसा अफाट आहे. अवैध वाळू प्रक्रियेत महसूल यंत्रणा ‘अर्थपूर्ण’ तडजोडी करीत मौन बाळगून आहे. दिवसभरात या दोन्ही तालुक्यांतून गंगाखेडहून परळीकडे जाणाऱ्या, तसेच पालम तालुक्यातून नांदेड जिल्ह्याकडे जाणाऱ्या वाळूच्या मालमोटारी मोठय़ा प्रमाणावर दिसतात.
दिवसाच नव्हे, तर रात्रीसुद्धा वाळूची चोरी मोठय़ा प्रमाणात होत आहे. या दोन्ही तालुक्यात वाळूचे अधिकृत धक्के किती व चोरटय़ा मार्गाने होणारी वाळूविक्री किती, याचा खरोखरच शोध घेण्याची गरज आहे. जिल्हा प्रशासन मात्र या बाबत कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत वाळू घेऊन जाणाऱ्या मालमोटारी अविरत दिसतात. असे असताना याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. या दोन्ही तालुक्यात अनेक ठिकाणी वाळूची साठेबाजी केल्याचे आढळून येते. मोकळी मैदाने व गोदावरी पात्रालगत शेते वाळूने आच्छादली आहेत. मोठमोठे ढिगारे वाळूउपशाने तयार झाले आहेत. परंतु तलाठय़ापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वाचेच याकडे दुर्लक्ष होत आहे.
विशेष म्हणजे सर्वत्र अवैध रेती उपशाबाबत ओरड होत असताना मूग गिळून असलेल्या महसूल प्रशासनाला आता कुठे जाग आली. अवैध वाळूउपशाचा संबंध महसूल प्रशासनातून अधिकाऱ्यांच्या ‘अर्थपूर्ण’ तडजोडीशी जोडला जात असताना रविवारी गंगाखेडच्या पथकाने कारवाई करीत अवैध वाळूवाहतूक करणारी मालमोटार (एमएच २४ – ७९७५) पकडून १२ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला. गोदावरी पात्रातून होणाऱ्या अवैध वाळूउपशाची मोठी किंमत या भागातील जनतेला भविष्यात चुकवावी लागणार आहे. आताच कोरडेठाक असलेल्या गोदावरी पात्रात वाळूमाफियांनी मोठमोठे खड्डे तयार केले आहेत.
पूर्णा तालुक्यातही अनधिकृत मोठय़ा प्रमाणावर वाळूचा उपसा होत असून वाळूमाफियांनी आडवळणाचे रस्ते तयार करून त्या मार्गाने चोरटी वाहतूक सुरू ठेवली आहे. पुढील महिन्यात पावसाळा सुरू होतो. त्यामुळे आताच वाळूचे साठे करण्याकडे वाळूमाफियांचा कल आहे.