महिलांना एकत्रित आणण्यासाठी भजन सुरू करण्यासह नागरिकांना वैद्यकीयदृष्टय़ा भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडविण्यासाठी शहरातील साने गुरुजी समाजसेवक मंडळाने पुढाकार घेतला आहे.
समाजसेवा करणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी त्याचे स्वरूप व्यक्तिगत आहे. काही ठिकाणी समाजसेवेसाठी लोकांना इच्छा असूनही वेळ देता येत नाही. त्यातही याबाबतीत एकत्रितरीत्या प्रयत्न होण्याचे प्रमाण अगदीच अल्प. पण येथील कोतवाल पार्क, टिळकवाडी परिसरातील काही जणांनी त्यासाठी एकत्रितरीत्या प्रयत्न करण्याचे ठरवून ‘साने गुरुजी समाजसेवक मंडळ’ स्थापन केले. ‘धामणकर कॉर्नर’कडून डॉ. काकतकर यांच्या रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका बंगल्यात हे मंडळ स्थापन झाले. यापूर्वी व्यक्तिगत पातळीवर समाजसेवा करणारे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता सी. यू. दाभाडे यांची मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांनी याआधी त्यांच्या ट्रस्टतर्फे सहा रुग्णवाहिका वेगवेगळ्या भागांत वितरित करून एक फिरता दवाखाना सुरू केला. शाळा, आश्रमशाळा सुरू करून अनेक आदिवासींना मदतीचा हात दिला आहे.
सानेगुरुजी समाजसेवक मंडळातर्फे सर्वप्रथम परिसरातील महिलांना एकत्र आणण्यात आले. त्यासाठी भजनाचे निमित्त शोधले गेले. त्यांनी भजन शिकण्यास सुरुवात केली. त्यामुळे प्रशिक्षित भजनी महिला दर शनिवारी व सोमवारी येऊ लागल्या. सर्वाना उत्साह वाटू लागला. त्यानंतर विविध आजारांवर औषधाविना उपचारासाठी ‘न्युरोथेरेपी सेंटर’ येथे सुरू करण्यात आले. एका बैठकीत ‘धर्मार्थ पॅथॉलॉजिकल कलेक्शन सेंटर’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात रक्त व लघवीच्या चाचण्यांसह इतर तपासण्या अल्प दरात कायमस्वरूपी देण्याचा निर्णय झाला. साई समर्थ क्लिनिकल लॅबचे संचालक नीलेश जगताप यांनी त्यासाठी सहकार्याचा हात पुढे केला. कोणत्याही आजारावर उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांकडून रक्त, लघवी, थुंकी, विष्ठा यांची तपासणी करण्यास सांगितले जाते. त्यासाठी येणारा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा असतो. मंडळाने हीच बाब हेरली.
एवढेच करून मंडळ थांबले नाही, तर व्यक्ती आणि कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी त्यांनी व्याख्यानमाला सुरू केली. मानसिक व आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ या व्याख्यानमालेत मार्गदर्शनासाठी येतात. वैचारिक प्रबोधनाच्या विविध सीडी मंडळाच्या कार्यालयात दाखविल्या जातात. समाजसेवेचा   वारसा    घेतलेल्यांची  चळवळ आता शहरात फोफावू लागल्याचे यावरून दिसत आहे.
या चळवळीत अनेकांनी स्वत:ला झोकून दिले आहे. या मंडळाच्या कार्याचा लाभ घेण्यासाठी गरजूंनी ९३२६४३०१११ आणि ९३७३८४०१११ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.