विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळावी, या साठी सानेगुरुजी कथामालेच्या वतीने दीडशे विद्यार्थ्यांसाठी संस्कार वर्ग सुरू करण्यात आले आहेत.‘श्यामची आई’ पुस्तकाचे प्रकट वाचन या वर्गात सुरू असून, मंठा येथील यशस्वी प्रयोगानंतर परतूरला २८ ऑक्टोबरपासून हा उपक्रम सुरू झाला आहे. ४२ आठवडे हा उपक्रम सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणाचे कौशल्य विकसित व्हावे, असा या मागे उद्देश आहे.
जालना जिल्ह्य़ातील मंठा येथे १९९४पासून सानेगुरुजी कथामालेमार्फत संस्कार वर्ग घेतले जातात. दिवंगत प्रा. भगवान काळे यांनी कथामालेची रुजवात केली. हेलस येथे कथामालेचे अध्यक्ष दत्तात्रय हेलसकर यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम हाती घेतले होते. सामान्यज्ञान स्पर्धेचे सातत्यही त्यांनी टिकविले, तसेच ‘श्यामची आई’ हा ग्रंथही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविला जात आहे. संस्कार वर्गाचा प्रारंभ कीर्ती राऊत या विद्यार्थिनीच्या हस्ते करण्यात आला. या वेळी डॉ. एस. जी. बाहेकर, प्रा. सुहास सदावर्ते यांनी मार्गदर्शन केले. विविध कथाकार व प्रसिद्ध कार्यकर्ते विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार आहेत.