तालुक्यातील नांदुरी येथील सप्तशृंग गडावर आठ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चैत्रोत्सवावर लोकसभा निवडणुकीचे सावट पूर्णपणे दिसत असून या उत्सवाच्या पूर्वतयारी बैठकीत सुरक्षा पुरविण्याच्या मुद्यावर विश्वस्त मंडळ आणि पोलीस प्रशासन या दोघांनी एकमेकांकडे बोट दाखविल्याने कोणताही निर्णय झाला नाही.
कळवण विभागाचे प्रांतधिकारी अस्तिककुनार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली सप्तशृंग गडावर विश्वस्त मंडळाच्या सभागृहात तालुक्यातील मुख्य अधिकारी, व्यावसायिक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत यात्रा नियोजन बैठक घेण्यात आली. चैत्रोत्सवात गडावर येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वर्षांगणिक वाढ होत असून यावर्षी ही संख्या २० लाखापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर यंदा यात्रेसाठी अधिक संख्येने पोलीस उपलब्ध होण्याची शक्यता कमी असल्याचे गृहीत धरून अतिरिक्त खासगी सुरक्षा पुरविण्याची सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी सचिव गुंजाळ यांनी विश्वस्त मंडळाकडे केली. परंतु विश्वस्त मंडळाने आपल्याकडे सुरक्षा कर्मचारी मंदिराच्या सुरक्षेपुरतेच असून इतर बंदोबस्ताची जबाबदारी आपली नसल्याचे सांगत हात झटकले. त्यामुळे यावर्षी यात्रेसाठी सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून या बैठकीत या विषयावर कोणताही ठोस निर्णय झाला नाही. तर, मंदिर वगळता गड व गावाची स्वच्छता विश्वस्तांनी करायची की ग्रामपंचायतीने यावर ग्रामपंचायत आणि विश्वस्त मंडळात चांगलीच ‘तू तू मै मै’ झाली. ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके यांनी यात्रेचा लाभ मंडळाला होत असल्याने स्वच्छता करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली असल्याने त्यांनी टाळाटाळ करू नये अशी सूचना केली. परंतु या विषयावरही बैठकीत कोणताच निर्णय झाला नाही.
याशिवाय गडावर बस स्थानक नसल्याच्या मुद्यावरही चर्चा झाली. प्रत्येक बैठकीत बस स्थानकासाठी जागा मिळावी म्हणून प्रस्ताव सादर करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाने या बैठकीतही तेच उत्तर दिल्याने परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसून आले.
यात्राकाळात तात्पुरते बस स्थानक लवकर तयार करण्यात यावे तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बस स्थानक परिसरात दोन नियंत्रण कक्ष, शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भाविकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना करण्यात आल्या. आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा, वीज वितरण या विभागांसह विश्वस्त मंडळ व सप्तशृंग गड ग्रामपंचायत यांना काय तयारी झाली याचा अहवाल आठ दिवसात प्रांत कार्यालयाला देण्याची सूचना प्रांताधिकाऱ्यांनी दिल्या. बैठकीस तहसीलदार अनिल पुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन गुंजाळ, विश्वस्त दिलीप वनारसे, वसंत देशमुख, पोलीस निरीक्षक मधुकर गावित यांसह इतर अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.