अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने फटाकेमुक्त दिवाळी साजरी करून पर्यावरण रक्षणासाठी करण्यात आलेल्या आवाहनास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. यंदाच्या दिवाळीत फटाक्यांची खरेदी करण्याऐवजी त्या पशातून पुस्तके, खेळणी व किल्ले बांधणीचे साहित्य खरेदी करण्याचा संकल्प तीन हजार विद्यार्थ्यांनी केला आहे. फटाक्यावर खर्च होणारी १५ लाख रुपयांच्या रक्कमेची बचत या संकल्पनेमुळे झाली आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी फटाकेविरोधी अभियान चालविले जात आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना फटाकेमुक्त दिवाळी साजरी करून, आपल्या विवेकी कृतीतून विनम्र अभिवादन करण्याचे आवाहन शहर व परिसरातील विविध शाळांमधून करण्यात आले. फटाक्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, अपघाताने भाजणे, आग लागणे, वृद्ध, आजारी, परीक्षार्थी आदी घटकांना होणारा त्रास, फटाका उद्योगात होणारे बालकामगारांचे शोषण आदी बाबींची माहिती असणारे एक पत्रक समितीच्या वतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले. यावर फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी विद्यार्थ्यांना जयंत नारळीकर, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. नरेंद्र जाधव, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर व सिनेकलावंत नाना पाटेकर आदींनी आवाहन केले आहे.
विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या संकल्पपत्राच्या प्रती उस्मानाबाद अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने एकत्रित करण्यात आल्या. शहर व परिसरातील १२ प्रशालांमधून तीन हजार ६२ विद्यार्थ्यांनी संकल्पपत्र भरून यंदाच्या दिवाळीत फटाके व शोभेच्या दारूवर खर्च करण्यात येणारे १५ लाख रुपये बचत करण्याचा संकल्प आपल्या पालकांच्या सहमतीने केला आहे. छत्रपती शिवाजी विद्यालयातील ४५१, सत्यभामा िशदे विद्यालय ६०, गांधी विद्यालय चिखली ३७०, नगरपालिका शाळा क्रमांक दोन १३७, सिद्धेश्वर निवासी विद्यालय १२०, नूतन प्राथमिक विद्यामंदिर १००, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय १००, जिल्हा परिषद प्रशाला तुळजापूर १४५, भाई उद्धवराव हायस्कूल तुगांव २०५, भाई उद्धवराव पाटील प्रशाला उस्मानाबाद ३६४, केशव विद्यालय खानापूर १५६, तेरणा साखर कारखाना प्रशाला ढोकी येथील ५६० विद्यार्थ्यांनी हा संकल्प केला आहे. या बचत झालेल्या रकमेतून पुस्तके, खेळणी व दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी किल्ला बांधणीस लागणारे साहित्य खरेदी करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी या संकल्पपत्रामध्ये नमूद केले आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी उस्मानाबाद अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष एम. डी. देशमुख, कार्याध्यक्ष भाग्यश्री वाघमारे, प्रधान सचिव बालाजी तांबे यांच्यासह सुजित ओव्हाळ, शरयू टेकाळे, सुभाष चव्हाण, आनंद वीर, भारती ठवळे, गोकुळदास नेरे, विशाल वाघमारे, शेखर गिरी आदींनी परिश्रम घेतले. समितीच्या वतीने फटाकेमुक्त पर्यावरण रक्षणासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणाऱ्या प्रशालांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 1st Nov 2013 रोजी प्रकाशित
तीन हजार विद्यार्थ्यांची १५ लाख रुपयांची बचत
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने फटाकेमुक्त दिवाळी साजरी करून पर्यावरण रक्षणासाठी करण्यात आलेल्या आवाहनास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
First published on: 01-11-2013 at 01:56 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saving of 15 lakhs rs of three thousend student