रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते मुंबईकरांसाठीच्या मोबाइल तिकीट सेवेचे उद्घाटन करून दिल्यानंतर या सेवेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने आता रेल्वे नवनव्या शकला लढवीत आहे. मोबाइलवर तिकीट काढल्यानंतरही त्याची छापील प्रत घेण्यासाठी एटीव्हीएम यंत्रांपुढे रांगा लावाव्या लागत असल्याने ही सेवा लोकप्रिय झाली नाही. आता रेल्वे प्रत्येक स्थानकावर मोबाइल तिकिटांसाठी स्कॅनिंग यंत्र बसवण्याच्या विचारात आहे. या यंत्राद्वारे मोबाइलमधील तिकीट तातडीने छापून मिळणार आहे. ही योजना मार्च २०१५ पर्यंत प्रत्यक्षात उतरणार असल्याचे मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी २७ डिसेंबर रोजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते मोबाइल तिकीट या सुविधेचे लोकार्पण दादर येथे झाले. मोबाइलवरून तिकीट काढण्यासाठी रेल्वेने विकसित केलेले अॅप मोबाइलमध्ये असणे आवश्यक होते. तसेच ‘आर वॉलेट’ या संकल्पनेमार्फत पैशांचा व्यवहार होतो. मात्र हे रेल्वे तिकीट छापण्यासाठी एटीव्हीएम यंत्रांचा आधार घेण्याची गरज आहे. नेमकी हीच गोष्ट प्रवाशांच्या पसंतीस न उतरल्याने मोबाइल तिकीट योजनेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. २८ जानेवारीपर्यंतच्या एका महिन्यात फक्त १०७८ तिकिटांची विक्री झाली असून १२७२ प्रवाशांनी या तिकिटांच्या आधारे प्रवास केला. तर या तिकिटांमधून रेल्वेला केवळ १८४३० रुपयांचे किरकोळ उत्पन्न मिळाले.
आता मोबाइल तिकीटधारकांची संख्या वाढवण्यासाठी रेल्वेने नवीन योजना आखली आहे. या योजनेनुसार प्रत्येक रेल्वे स्थानकात मोबाइल तिकीट स्कॅनर बसवण्यात येणार आहे. या स्कॅनरवर मोबाइल ठेवला असता छापील तिकीट हातात मिळणार आहे. रेल्वे मंत्रालयाला सुरुवातीलाच हे सर्व स्कॅनर स्थानकांवर बसवायचे होते. मात्र हे स्कॅनर तयार करणाऱ्या कंपनीला सॉफ्टवेअर बनवण्यास विलंब झाल्याने ‘क्रिस’ या कंपनीने एटीव्हीएम यंत्रांशी संलग्न ‘आर वॉलेट’ ही संकल्पना आणली. आता मार्च २०१५ पर्यंत रेल्वे स्थानकांवर ही स्कॅनिंग यंत्रे लागणार असल्याची माहिती एका बडय़ा अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे प्रवाशांना एटीव्हीएम यंत्रासमोर रांग लावावी लागणार नाही. परिणामी मोबाइल तिकीट योजनेची व्याप्ती वाढून तिकीट खिडक्यांवरील भारही कमी होईल.