राज्यातील सर्व शाळा सोमवारी अर्थात, १६ जूनला सुरू होऊन खणाणलेल्या पहिल्या घंटेला स्वागत गुलाबपुष्पांनी करण्यात आले असले तरी आणि राज्यभर प्रभात फेऱ्या काढून शिक्षणासंबंधीची जागृती करण्यात आली असली तरी विदर्भात मात्र आग ओकणाऱ्या सूर्याचा ताप लक्षात घेऊन २६ जूनला म्हणजे तब्बल दहा दिवस उशिरा सुरू होणार आहे. 

विदर्भात २६ हा दिवस सर्व शाळांमध्ये ‘पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. या दिवशी विदर्भातील सर्व अनुदानित शाळांमध्ये पहिली घंटा खणखणणार त्याच वेळी विद्यार्थ्यांंना पुस्तकांचे, वह्य़ा आणि शालोपयोगी साहित्याचे विनामूल्य वाटप शिक्षण विभागामार्फत केले जाणार आहे. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात शालोपयोगी साहित्याचे वाटप सोळा जूनला झाले असले तरी पाचवीच्या स्वाध्याय पुस्तिका मात्र शाळांमध्ये पोहोचलेल्या नाहीत. विदर्भात पुस्तक दिनाच्या दिवशी कोणत्याही विषयाची पुस्तके शाळेची घंटा खणखणण्यापूर्वी पोहोचली नाही, अशी तक्रार राहणार नाही, याची काळजी अमरावती आणि नागपूर विभागातील शिक्षण उपसंचालकांनी घेतली असल्याचे समजते.
यंदाच्या शैक्षणिक वर्षांत सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांंना अब्जावधी रुपयाची एक कोटीवर पुस्तकांच्या संचांचे मोफत वाटप विदर्भ वगळता उर्वरिता राज्यात करण्यात आले आहे. खासगी विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थी मात्र या योजनेपासून वंचित राहणार आहेत. अलीकडे जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक स्तर घसरत असल्याच्या तक्रारी असून अनेक पालकांचा कल आपल्या पाल्यांना खाजगी शाळांमध्ये टाकण्याकडे दिसत आहे. मोफत पुस्तक वाटप योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्य़ात ३३०० शाळांमध्ये शिकत असलेल्या आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांंना साडेतीन लाख पुस्तकांच्या संचांचे वाटप केले जाणार आहे.

सारे शिकू या, मागेच राहू या
सर्व शिक्षा अभियानअंतर्गत ‘सारे शिकू या, पुढे जाऊ या’ चा नारा निनादत असून प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोटय़वधी रुपयांची पुस्तके सरकारकडून मोफत दिली जातात. मात्र, ही योजना जिल्हा परिषद, नगरपालिका आणि खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांंसाठीच आहे. त्यामुळे विनाअनुदानित खाजगी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी मोफत पुस्तकांपासून वंचित राहणार आहेत. त्यांना बाजारातून पुस्तके विकत घेणे भाग आहे. ‘सारे शिकू या, पुढे जाऊ या’ असा अनुदानित शाळेत शिकणाऱ्यांचा नारा असला तरी विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांंना मात्र ‘सारे शिकू या, मागेच राहू या’ चा अनुभव घ्यावा लागेल, असे चित्र आहे. कारण, त्यांना मोफत पुस्तक योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. मोफत पुस्तकांनी नव्हे, तर केवळ गुलाबपुष्पांनी त्यांचे स्वागत तेवढे जाणार आहे. सर्व शिक्षा अभियानचा हेतू मात्र त्यामुळे साध्य होणार नाही, हे स्पष्ट आहे.