बालमृत्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि युनिसेफ यांच्यातर्फे बालमृत्यूची कारणे शोधण्यासाठी नाशिक जिल्ह्यात ‘कॉल अ‍ॅक्शन फॉर चाइल्ड सव्‍‌र्हायव्हल’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या १० तालुक्यांमध्ये प्राथमिक स्तरावर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या सर्वेक्षणात कमी वयात होणारे लग्न, गावातील अस्वच्छता आणि जुन्या चालीरीती ही कारणे मुख्यत्वे पुढे येत आहेत.
राज्य स्तरावरून बालमृत्यू नियंत्रणात आणण्यासाठी विविध स्तरांवरून प्रयत्न सुरू आहेत. मात्र एकीकडे सेवा-सुविधांचा ओघ आणि दुसरीकडे बालमृत्यूचा दर स्थिर याची कारणे शोधून काढण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, युनिसेफच्या वतीने सध्या ‘कॉल अ‍ॅक्शन फॉर चाइल्ड सव्‍‌र्हायव्हल’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या सुरगाणा, पेठ, त्र्यंबक, दिंडोरी, कळवण, देवळा, नांदगाव, मालेगाव, इगतपुरी, सटाणा आदी तालुक्यांची निवड करण्यात आली. ‘कॉल’च्या माध्यमातून होणाऱ्या सर्वेक्षणात रुग्ण आणि रुग्ण सेवा देणाऱ्या संस्था उभयतांच्या तपासणीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यात रुग्णालयांच्या बाबतीत त्यांचे भौगोलिकदृष्टय़ा वर्गीकरण, वंचित भाग, तेथे असणाऱ्या अंगणवाडी, मनुष्यबळाची उपलब्धता, त्यांना आवश्यक प्रशिक्षण, आरोग्य केंद्रातील आवश्यक औषधसाठा आदींची माहिती संकलित करण्यात आली. तसेच कुपोषित बालकांची संख्या, सद्यस्थिती, त्यांना दिले जाणारे स्तनपान, आहार, पाण्याची उपलब्धता, स्वच्छता यांचीही तपासणी करण्यात आली. दरम्यान, गावपातळीवर १६ मातांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीच्या माध्यमातून ते बाळाची काळजी कशी घेतात, त्यांच्या लसीकरणाला दिले जाणारे महत्त्व, बाळाचा आहार, स्तनपान आदींची माहिती घेण्यात आली. सर्वेक्षणाच्या माध्यमातून समोर येणाऱ्या माहितीतून निष्कर्ष काढण्यासाठी, त्यावर उपाय सुचविण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी आदींचा समावेश असलेली एक समिती गठित करण्यात आली. सध्या काही गावांचे निष्कर्ष हाती येण्यास सुरुवात झाली असून यामध्ये बालमृत्यूस कमी वयात होणारे लग्न, मुलगा हवा म्हणून वारंवार होणारे गर्भपात, व्यसनाचे वाढते प्रमाण आणि गावात होणारा दूषित पाण्याचा पुरवठा ही कारणे समोर आली आहेत.