वाघ, बिबटय़ा, शेकरू, हिमालयीन अस्वल यांसह विविध प्राण्यांची शिर, कातडे, खूर, शिंगे अशा विविध अवयवांचा मोठा साठा सोमवारी वनविभागाने कोल्हापुरात छापा टाकून जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत कोटय़वधी रुपये आहे. याप्रकरणी मच्छिंद्र शंकर कोकणे (वय ४५,रा.जवाहरनगर) याला अटक करण्यात आली आहे. सांगली येथे दोन दिवसांपूर्वी सुमारे सव्वा कोटी रुपयांचा सापांच्या विषाचा साठा छापा टाकून जप्त करण्यात आला होता. या पाश्र्वभूमीवर आजची वनविभागाची कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
जवाहरनगर येथे राहणाऱ्या मच्छिंद्र कोकणे याच्या घरी प्राण्यांच्या अवयवांचा साठा गेल्या अनेक दिवसांपासून असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक कोकणे याच्या घरी पोहोचले. तेथे छापा टाकल्यानंतर प्राण्यांच्या अवयवांचा मोठी खजिनाच त्यांच्या हाती लागला. त्यामध्ये वाघ, बिबटय़ा, भेकर, मगर, शेकरू, हिमालयीन अस्वल, सांबर, गवा अशा विविध २७ प्राण्यांच्या अवयवांचा साठा अधिकाऱ्यांच्या हाती लागला. त्यामध्ये या प्राण्यांची शीर, खूर, कातडी, शिंगे आदी अवयवांचा समावेश होता.
अधिकाऱ्यांनी या साहित्याची कसून पाहणी केली. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात कोटय़वधी रुपये किंमत असल्याचे सांगण्यात आले. याबाबत बिंदू चौकातील कार्यालयात रात्री उशिरापर्यंत छाप्यामध्ये सापडलेल्या प्राण्यांच्या अवयवांची मोजदाद करण्याचे काम सुरू होते. दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मच्छिंद्र कोकणे याच्याकडे हे साहित्य कोठून आले याची चौकशी केली. तेव्हा त्याने आपण प्राण्यांची कातडी, शिर, शिंगे, खूर आदी अवयवांची देखभाल दुरुस्ती करीत असतो, त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या तेल व अन्य साहित्यांचा वापर करतो. यासाठीच विविध लोकांकडून हे साहित्य आपल्याकडे आले आहे, अशी कबुली त्याने दिली आहे.