ठाणे जिल्ह्य़ातील शहापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नव्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून या इमारतीचा उद्घाटन सोहळा येत्या रविवारी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणे मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनावणे असणार आहेत. शहापूर येथील न्यायालयाची स्वत:ची इमारत नसल्यामुळे दिवाणी व फौजदारी न्यायालय भाडय़ाच्या जागेत कार्यरत होते. त्यामुळे पुरेशा जागेअभावी पक्षकार, वकील व कर्मचारी यांची गैरसोय होत होती. शहापूर येथे ७९८ दिवाणी व २६९२ फौजदारी प्रकरणे प्रलंबित असून ५० हून जास्त पुरुष व महिला वकील कार्यरत आहेत. न्यायालयाच्या नव्या प्रशस्त इमारतीमुळे शहापूर तालुक्यातील नागरिक व वकिलांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे.