केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ हे दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. लोकांच्या भावना दुखावल्यावर काय होते हे गत लोकसभा निवडणुकीत मी दाखवून दिले आहे, असा उल्लेख करुन खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी शनिवारी जनता माझ्यासोबत असून कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेसचीच असल्याचा दावा केला. आपले पुत्र प्रा.संजय मंडलिक हे जिल्हा परिषदेवर तीन वेळा निवडून आले. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या उमेदवारीचा विचार व्हावा अशी मागणी करीत त्यांनी अन्य कोणता उमेदवार काँग्रेस पक्षाने दिल्यास त्याला निवडून आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार निवडून आणून राष्ट्रवादीला अद्दल घडवा, असे आवाहन त्यांनी केले.
खासदार मंडलिक यांच्या निवासस्थानी आयोजित कृतज्ञता मेळाव्यात शनिवारी जिल्ह्य़ातील प्रमुख कार्यकर्त्यांनी मनोगते व्यक्त केली. या वेळी कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेसचीच असून कोणताही उमेदवार द्या अशी मागणी केली. कार्यकर्त्यांचा मागणीचा उल्लेख करीत  मंडलिक म्हणाले, निवडून यायचे असेल तर लोकांच्यावर प्रेम करावे लागेल. लोकभावना दुखावल्या तर लोक नेत्यांना त्यांची जागा दाखवतात. मागील लोकसभा निवडणुकीत माझ्याविरोधात कोटय़वधी रुपये खर्च केले. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मी देवाच्या कृपेने आजारातून बरा झालो आहे. हा बोनस जन्म असून राहिलेली कामे आता पूर्ण करणार आहे.
माजी आमदार नरसिंग गुरुनाथ पाटील यांनी सहकारमंत्र्यांनी सहकाराची वाट लावली असून सहकार बुडवला आहे अशी टीका करत खा.राजू शेट्टी हे शेतकऱ्यांना भावनिक करून मते मिळवतात असे सांगितले.
राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष लेमनराव निकम म्हणाले,की कोल्हापूरच्या लोकसभेच्या जागेचा खुद्द शरद पवारांनीसुद्धा विचार करू नये. निवडणूक हा वैचारिक लढा आहे. माजी आमदार संजय घाटगे यांनी, काँग्रेस पक्षाचा उमेदवार ठरवण्याचा अधिकार मुश्रीफांना कोणी दिला, असा प्रश्न उपस्थित करत संजय मंडलिक हे कर्तबगार असल्याने त्यांना काँग्रेसने उमेदवारी द्यावी अशी मागणी केली. शहर काँग्रेस अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी, जिल्हा परिषद आणि नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आहे. त्यामुळे सदाशिवराव मंडलिकांनी उमेदवाराचे नाव घोषित करावे, आम्ही त्याला भरघोस मतांनी निवडून आणू अशी ग्वाही दिली. या वेळी प्रकाशराव आबिटकर, बी.एम.पाटील, अॅड. शिवाजीराव राणे, जयवंत हिरडेकर, मारुतीराव अडगुळे, बजरंग पाटील, गायत्रीदेवी सूर्यवंशी, जयवंत शिर्के, नगरसेवक श्रीकांत बनसोडे, मारुतीराव जाधव, निवासराव साळोखे, स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण, िहदुराव चौगुले यांनी मनोगते व्यक्त केली.
मधुचंद्र संपला
या आठवडय़ात सोमवारी कागल येथे पोस्ट कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी एकत्रित आलेल्या खासदार सदाशिवराव मंडलिक व कामगार मंत्री हसन मुश्रीफ या कट्टर राजकीय विरोधकांनी परस्परांचे गुणगान केले होते. त्यामुळे जिल्ह्य़ाच्या राजकीय पटलावर गुरु-शिष्यामध्ये पुन्हा एकदा ऐक्याचे वारे खेळू लागेल असा तर्क वर्तविला जात होता. पण अवघ्या पाचच दिवसात मंडलिक यांनी मुश्रीफ यांच्यावर स्टंटबाजी करणारा मनुष्य आहे अशा शेलक्या भाषेत समाचार घेत मुश्रीफांवर टीकेची तोफ डागली.