कराडकरांचा बहुमान ठरलेल्या विजय दिवस समारोहाच्या १५ वर्षांच्या कालखंडात माजी संरक्षणमंत्री व विद्यमान केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे प्रथमच उपस्थित राहणार आहेत. २३ डिसेंबर रोजी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर दुपारी ३ ते ६ या तीन तासात रंगणाऱ्या विजय दिवसच्या मुख्य कार्यक्रमाला शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
भारताने पाकिस्तानवर मिळविलेल्या बांगलादेश युध्दातील निर्णायक विजयाच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेले एक तप कराडच्या शिवाजी स्टेडियमवर यशस्वीरीत्या भरविण्यात येणारा यंदाचा विजय दिवस समारोह भव्य दिमाखात व भव्य स्वरूपात साजरा करण्यात येत आहे. प्रतिकूल परिस्थितीत देशाच्या संरक्षण खात्याचे आधारवड ठरलेले माजी संरक्षणमंत्री व उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षांत हा १५ विजय दिवस समारोह पार पडत असल्याने त्यास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
यंदाचा विजय दिवस समारोह १४ ते १७ डिसेंबर ऐवजी यंदा २० ते २३ डिसेंबर या कालावधीत परंपरेनुसार भरगच्च कार्यक्रमांनी साजरा होत आहे. विजय दिवसच्या कार्यक्रमाला २० डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता विजय दिवस चौक येथून शोभयात्रेने प्रारंभ होईल. संपूर्ण शहरातून देशाभिमान वृध्दिंगत करणारी ही मिरवणूक समारंभस्थळी विसावेल. सायंकाळी पाच वाजता लिबर्टी मैदानावर शस्त्रास्त्र, औद्योगिक व शेतीविषयक प्रदर्शनाचे उद्घाटन समारंभपूर्वक होणार आहे. या प्रदर्शनात यशवंतराव चव्हाण यांच्या देशपातळीवरील कामगिरीच्या विशेष छायाचित्रांचे दालन राहणार असून, त्यात तब्बल दीड हजार छायाचित्रांचा समावेश राहणार असल्याचे विजय दिवस समारोह समितीचे अध्यक्ष कर्नल संभाजीराव कणसे-पाटील यांनी सांगितले.
२१ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता दत्त चौकातून निघणाऱ्या कराड दौड अर्थात रन फॉर कराडला प्रारंभ होईल. दुपारी साडेबारा वाजता यशवंतराव चव्हाण स्मृतिदिन येथे सैनिक संमेलन होईल. सायंकाळी साडेसहा वाजता टिळक हायस्कूलच्या प्रांगणात संगीत रजनी हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. २२ डिसेंबर सकाळी साडेआठ वाजता लिबर्टी हॉल येथे रक्तदान शिबिर होईल. सायंकाळी ७ वाजता वेणूताई चव्हाण सभागृहामध्ये जीवन गौरव व यशवंत गौरव पुरस्कार प्रदान सोहळा होईल. त्यात भारती अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम यांना यशवंत जीवन गौरव पुरस्काराने डॉ. अरुण निगवेकर यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. २३ डिसेंबर रोजी दुपारी ३ ते सायं. ६ यावेळेत छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे विजय दिवस समारोहाचा मुख्या कार्यक्रम होईल. या कार्यक्रमास केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 11th Dec 2012 रोजी प्रकाशित
विजय दिवस कार्यक्रमाला शरद पवार यांची उपस्थिती
कराडकरांचा बहुमान ठरलेल्या विजय दिवस समारोहाच्या १५ वर्षांच्या कालखंडात माजी संरक्षणमंत्री व विद्यमान केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे प्रथमच उपस्थित राहणार आहेत.
First published on: 11-12-2012 at 08:17 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar will attend vijay din function