गडकिल्ल्यांच्या संवर्धनार्थ कार्यरत येथील शिवकार्य गडकोट मोहिमेच्या कार्यकर्त्यांनी बाराव्या टप्प्यात भर उन्हात त्र्यंबकेश्वरच्या उपरांगेत असलेल्या रांजणगिरी किल्ल्यावर स्वच्छता उपक्रम राबविला. अवघड चढाई पूर्ण करून कार्यकर्त्यांनी किल्ल्यावरील बुजलेल्या शिवकालीन तळ्याची खोदाई आणि स्वच्छता केली. याप्रसंगी गडकोट संवर्धकांनी शिवकालीन किल्ल्यांची बिकट अवस्था दूर करण्यासाठी झटण्याचा संकल्प केला.
यापुढे नाशिक जिल्ह्य़ातील गडकिल्ल्यांचा उज्ज्वल इतिहास नाशिककरांना कळावा. आणि किल्ल्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांनी योगदान द्यावे म्हणून जूनमध्ये दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या माध्यमातून शिवकार्य गडकोट मोहीम या संस्थेच्या पहिल्या वर्धापनदिनी व्याख्याने, माहितीपट, वर्षभरातील १२ मोहिमांच्या १५ हजार छायाचित्रांचे प्रदर्शन अशा कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. खुल्या परिसंवादातून नाशिकच्या शिवकालीन इतिहासाचा प्रसार केला जाणार असल्याची माहिती मोहिमेचे संस्थापक राम खुर्दळ यांनी दिली.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात अंजनेरीच्या मागील बाजूला मुळेगावजवळ रांजनगिरी (बुधलीचा डोंगर) हा किल्ला आहे. दोन हजार ७९० मीटर उंचीच्या रांजनगिरी किल्ल्याची कागदोपत्री फारशी नोंद नाही. गिरीदुर्ग प्रकारातील या किल्ल्याची चढाई पायऱ्या नसल्याने अवघड आहे. डहाणू येथील समुद्रमार्गे येणारा माल हा रांजनगिरी, भास्कर गडमार्गे जात असे. या व्यापारी मालाच्या सुरक्षेसाठी हे किल्ले अत्यंत महत्त्वाचे होते. पाणी साठविण्याच्या रांजणाप्रमाणे या किल्ल्याचा आकार असल्याने म्हणून त्यास ‘रांजणगिरी’ किल्ला म्हणतात. किल्ल्यावर प्रवेशव्दार, तटबंदी आणि बुरूज यापैकी काहीही नाही. किल्ल्यावर केवळ पाण्याच्या दोन मोठय़ा टाक्या आहेत. या टाक्या मातीने बुजलेल्या होत्या. त्यात मोठे दगड पडलेले होते. किल्ल्यावरील टाक्या कोरडय़ा असल्याने इथे प्राणीही नाहीत. पक्षीही फारसे दिसले नाहीत. झाडेही विशेष नाहीत.
संस्थेच्या कार्यकर्त्यांनी टिकाव, फावडे घेऊन शिवकालीन टाक्या खोदून त्यातील माती बाहेर काढली. दगड काढून टाक्या स्वच्छ केल्या. टाक्या स्वच्छ करण्यात आल्याने पावसाचे पाणी या टाक्यांमध्ये साचू शकेल. भर उन्हातही श्रम करायचे आणि गडकोटांच्या संवर्धनासाठी झटायचे असा निश्चय यावेळी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केला.
या मोहिमेत संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ, मुख्य संयोजक आनंद बोरा, पक्षीमित्र भीमराव राजोळे, गडकोट अभ्यासक मयुरेश जोशी, पोपटराव गायकवाड, बाळासाहेब मते, दर्शन घुगे आदी सहभागी झाले
होते.