महापालिकेची सत्ता माझ्या हाती द्या, या शहराचा चेहरामोहरा बदलवून टाकेल..अनोखे प्रकल्प साकारून शहराचे रूप पालटविणे आपली आवड आहे..टक्केवारीसारख्या फालतू कामांसाठी आपण सत्ता राबविणार नाही.. हे आणि असे कित्येक लोकप्रिय संवाद म्हणत राज ठाकरे यांनी महापालिकेवर मनसेचा झेंडा फडकविला खरा, तथापि गेल्या दीड वर्षांत नेमके काय नवनिर्माण केले असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे. त्यातच रिमझिम पावसामुळे रस्त्यांना सर्वत्र खड्डे पडल्याने मनसेला कोंडीत पकडण्यासाठी संधीची वाट पहात असलेल्या विरोधकांना खड्डेमय रस्त्यांमुळे शहरवासीयांचे जीवन असह्य झाल्याचा साक्षात्कार झाला. या प्रश्नावरून मनसेला घेरण्यासाठी शिवसेना पुढे सरसावली असून शुक्रवारी महापौरांच्या प्रभागात लांब उडीची स्पर्धा घेत प्रतिकात्मक निषेध करण्याचा पवित्रा स्वीकारला.
शहरात पावसाळ्यात पडणारे खड्डे ही नेहमीची समस्या असली तरी त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा विचार केला जात नाही. मुंबई शहरातील रस्त्यांच्या अवस्थेवरून मनसेने आंदोलन तीव्र केले असताना त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी स्थानिक शिवसैनिक पुढे आल्याचे दिसत आहे. पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची चाळणी होत असल्याची बाब सत्ताधारी व प्रशासनाला ज्ञात आहे. असे असूनही मान्सूनपूर्व बैठक घेऊन त्यादृष्टिने कोणतीही तयारी केली गेली नाही. त्याचाच परिपाक शहरात रस्त्यांवरून पायी चालणेही अवघड होण्यात झाला असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. रस्त्यांवरील खड्डय़ांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी पालिकेतील शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली टिळकपथ रस्त्यावर ‘लांब उडी महापौर चषक’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. रस्त्यांवरून सर्वसामान्यांना पायी चालणे अवघड झाले आहे. यामुळे महापौरांच्या प्रभागापासून या स्पर्धेला सुरूवात करणे योग्य ठरल्याचे बोरस्ते यांनी सांगितले. स्पर्धेत नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होत सत्ताधारी व प्रशासनाच्या कार्यशैलीचा निषेध नोंदविला. यावेळी सहभागी प्रत्येक स्पर्धकास बक्षिस म्हणून एक चॉकलेट आणि लांब उडी मारणाऱ्या स्पर्धकास मोठी ‘कॅडबरी’ देण्यात आली. याच स्वरूपाची स्पर्धा शहरातील सिडको, सातपूर, नाशिकरोड व इतर विभागातही घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी धुळे शहरातही शिवसेनेने अशीच स्पर्धा घेतली होती.

जीव धोक्यात
खड्डय़ांमुळे रस्त्यावरून दुचाकीने तर सोडाच पण पायी चालणेही अवघड झाले आहे. चालताना कपडे सांभाळायचे की आपला जीव ? वेगवेगळ्या कामांसाठी चांगले रस्ते तोडण्याची प्रक्रिया अव्याहतपणे सुरू असते. पावसाळा सुरू झाला की, त्यावर डागडुजीला सुरूवात करायची हे नेहमीचे झाले आहे. मुळात रस्त्यालगतच्या गटारी किंवा मोकळ्या जागांवर अनेकांनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणामुळे पाणी वाहून जाण्यास जागा नाही. रस्त्यांचा उतार बरोबर नाही. यामुळे पाणी ठराविक ठिकाणी साचते. त्याचा अंदाज न आल्याने अपघातही घडू शकतात. शिवाय ठेकेदारांकडून गल्लीबोळात बांधलेल्या रस्त्यांचा दर्जा अतिशय निकृष्ट आहे. आपल्याकडे समस्या निर्माण झाल्यावर नस्ती उठाठेव होते. मुळात ती उद्भवणार नाही, यादृष्टिने नियोजन करण्यास कोणाला ही वेळ नाही.
सेफ सय्यद

रस्त्यात खड्डा की खड्डय़ात रस्ता?
शहरात पसरलेले खड्डय़ांचे साम्राज्य पाहता रस्त्यात खड्डा की खड्डय़ात रस्ता असा प्रश्न पडतो. महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी नवनिर्माणाची टिमकी वाजविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हेच ‘नवनिर्माण’ केले असेच मत तयार होत आहे. खराब रस्त्यांमुळे वाहनांचे नुकसान तर होतेच. शिवाय अनेकदा अपघातही घडतात. याबाबत टीव्ही, रेडिओ विविध माध्यमातून चर्चा केली जात आहे. अद्याप प्रशासनाला पुरती जाग आलेली नाही. कुठलीही सामाजिक  संस्था वा राजकीय पक्ष खंबीर भूमिका घ्यायला तयार नाही. एकीकडे कुंभमेळ्याची चर्चा होत असतांना दुसरीकडे रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टिने कोणताही विचार होत नाही.                         – स्वप्नील जोशी

खड्डय़ात पहावे पडून..
पावसाळा म्हटले की डोळ्यांसमोर खड्डय़ांमुळे रस्त्यांची झालेली चाळणी दिसते. नेहमीच येतो पावसाळा म्हणण्यापेक्षा आता नेहमीच येतो खड्डा असे म्हणण्याची वेळ आली आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींची उदासीनता किती वेळ सहन करायची? महापालिकेच्यावतीने रस्त्यात खड्डा दिसला की लगेच खडी किंवा रेती टाकून काही ठिकाणी तर विटांचे तुकडे टाकून तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी करण्यात येते. मात्र ही मलमपट्टी एखाद्याचा जीव घेऊ शकते, हे कोणाच्या लक्षात येत नाही. एरवी कुठल्याही कारणाने पेटून उठणारे राजकीय पक्ष या प्रश्नाबाबत अद्याप रस्त्यावर आलेले नाहीत. एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा आता प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. मध्यंतरी राज ठाकरे यांचे शिष्टमंडळ पाहणी करून गेले. त्यानंतर पावसाळ्याच्या धर्तीवर महापालिकेच्या मुखंडानीही पाहणी केली. मात्र या पाहणीत रस्त्यांची दुरावस्था एकाच्याही नजरेत पडली नाही हे आपले दुर्देव म्हणावे लागेल. रस्त्यांवरील खड्डय़ात बळी जाण्याआधीच या संदर्भात ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
प्रा. डॉ. वृन्दा भार्गवे

कायमस्वरूपी उपाय आवश्यक
पावसाळ्याच्या पुर्वार्धातच रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर खड्डे दिसत आहेत. याबाबत महापालिकेच्यावतीने जी डागडुजी होते ती केवळ तात्पुरत्या स्वरूपाची. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असते. पालिका अशा कामातून ठेकेदाराचे हित जोपासत असली तरी नागरिकांच्या जिविताकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष होत आहे. यावर कायमस्वरूपी उपाय गरजेचा आहे. शहरात सध्या प्लास्टिक प्रदुषण मोठय़ा प्रमाणावर होत आहे. जमा होणाऱ्या प्लास्टिकचा डांबरीकरणात वापर केला तर दरवर्षी होणारा खर्च काही अंशी वाचविता येईल. त्यामुळे पालिकेवरील बोजा कमी होईल आणि कामाचा दर्जाही सुधारू शकतो.             
प्रा. आनंद बोरा