शहरातील भारनियमन वीज वितरण कंपनीने आठवडय़ात रद्द न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
विद्युत कंपनीस यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. शहरात भाग क्रमांक एक व दोन मध्ये घरगुती विजेचा वापर करणाऱ्या व देयक भरणारे ग्राहकही भारनियमनाच्या कचाटय़ात सापडले आहेत. नियमित देयक भरूनही वीज ग्राहकांवर अन्याय होत आहे. मनमाड हे कामगार वस्तीचे शहर असून मनमाडकर नियमित देयक भरून वीज वितरण कंपनीस सहकार्य करत आहेत. थकबाकी वसूल करणे, वीज चोरी पकडणे, ही संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी असून काही वीज देयक थकबाकीदारांमुळे सर्वच ग्राहकांवर भारनियमन लादून त्रास देणे हे अन्यायकारक आहे. खऱ्या अर्थाने वीज चोरी ही वीज कंपनीच्या संगनमतानेच  शहरात होत असल्याचा आरोपही शिवसेनेने केला आहे.
शहरात देयकांचे डिसेंबर २०१३ पर्यंत नऊ ते १२ कोटी रुपये वसूल झालेले आहेत. मार्च २०१४ या महिन्यात एक कोटी १६ लाख रुपये तर एप्रिल २०१४ मध्ये ६० लाख रुपये वसूल झाले असतानाही भारनियमनाचा बडगा शहरवासीयावर उगारण्यात आला आहे. शहरातील काही भाग संवेदनशील असून तेथे अंधाराचा फायदा घेऊन गुन्हे घडू शकतात. त्यामुळे आठ दिवसाच्या आत भारनियमन रद्द न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना शहरप्रमुख संतोष बळीद यांनी दिला आहे. यावेळी नाना शिंदे, दिलीप सोळसे, जाफर मिर्झा, राजाभाऊ कासार, बाळू माळवतकर आदी उपस्थित होते.