शिवाजी, कतरिना, सर्किट, येडा अण्णा, गब्बर, अमिताभ ही आहेत जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पट्टेदार वाघांची नावे. व्याघ्र भ्रमंतीसाठी जगभरातून येणाऱ्या पर्यटकांनी या पट्टेदार वाघांना दिलेली ही टोपण नावे आहेत. या नावांनीच आज ताडोबातील वाघ ओळखले जात आहेत.
फेब्रुवारी मध्यावर येऊन ठेपला असून उन्हाळ्याची चाहूल लागताच ताडोबात पर्यटकांची गर्दी सुरू झाली आहे. सोमवारी वनमंत्री पतंगराव कदम, वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, तसेच वनखात्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी ताडोबाचा दौरा करून बाहेर पडत असतानाच काही पर्यटक ताडोबा व्याघ्र प्रकल्पात प्रवेश करत होते. त्यांच्या तोंडून आज कतरी उर्फ बांडीला बघू, इतक्यात ती दर्शन देत असल्याची चर्चा आपसात सुरू होती. कतरी उर्फ बांडीच्या शोधार्थ पर्यटक वनभ्रमंती करत होते. ही कतरी म्हणजेच कॅटरीना कैफ. बॉलिवूडमध्ये कतरिना आघाडीची अभिनेत्री आहे, तसेच कतरी ही ताडोबा प्रकल्पातील क्रमांक एकची वाघीण आहे. तिला बघण्यासाठी पर्यटक दूरवरून येथे येतात. तिचे नितांत सुंदर छायाचित्रे घेऊन वनभ्रमंतीचा आनंद लुटून निघून जातात. गेल्या उन्हाळ्यात दोन छाव्यांसह पांढरपौनी तलावावर तळ ठोकून बसलेल्या कतरीने पर्यटकांना दर्शन दिले होते.
पर्यटकांना मनसोक्त दर्शन झाल्याने ती पर्यटकांमध्ये प्रसिध्दीला आली. साधारणत: तीन ते चार वर्षांपूर्वी तिच्या शेपटीला जखम झाल्यामुळे तिची शेपटी गळून पडली होती. या अध्र्या शेपटीच्या वाघिणीला कालांतराने कतरी, बांडी, तर कुणी प्रेमाने कतरिना नावाने ओळखू लागले. ही वाघीण अतिशय शांत, पण धीट स्वभावाची आहे. पर्यटकांच्या वाहनांना खेटून ती जात असते. अनेक पर्यटकांनी तिच्या पाठीवरून हातही फिरविला आहे, पण कुणालाच तिने आजवर इजा केलेली नाही. तिच्या शेपटीमुळे ती पर्यटकांना सहजपणे ओळखता येते. ही वाघीण पर्यटक, वन अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत लपंडाव खेळत असते. कधी अचानक ती बेपत्ता होते आणि कधी अचानक पर्यटकांच्या दृष्टीला दिसते. काही पर्यटकांना तिने दर्शन दिले तर काहींना निराशही केलेले आहे.
वनाधिकारीही ती गेल्या महिन्यात दिसली, असे सांगतात, तर काहींच्या मते ती अडीच महिन्यापासून ती दिसलीच नाही, असे सांगतात. पर्यटक तिच्या शिकारीचीही शंका बोलून दाखवितात, तर वनाधिकारी हा युक्तीवाद फेटाळून लावतात. ताडोबाच्या वसंत बंधारा वनक्षेत्रात बांडी तिच्या दोन्ही पिल्ल्यांसह दिसायची तेव्हा पर्यटक आनंदित व्हायचे. आता उन्हाळ्याला सुरुवात होताच बांडीच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या असून गेल्या उन्हाळ्याप्रमाणे यंदाही बांडीने पर्यटकांना असेच मनसोक्त दर्शन द्यावे, यासाठी पर्यटक ताडोबाकडे वळला आहे. अशी ही बांडी लोकप्रियतेत आणि नखऱ्यात कुणा चित्रपट नटीपेक्षा कमी नाही.
शिवाजी दि किंग ऑफ कोळसा, अशी ओळख असलेला हा पट्टेदार वाघ कोळसा वनपरिक्षेत्रातील दादा म्हणून ओळखला जातो. शिवाजीचे वैशिष्टय़ म्हणजे त्याच्या जाडय़ाभरडय़ा लांबलचक मिशा, मोठ्ठे डोळे आणि लांबच लांब शरीर. शिवाजीने आजवर खूप कमी पर्यटकांना दर्शन दिले आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील हा सर्वात वयस्व वाघ असल्याचे वनाधिकारी सांगतात. कोळसाच्या मोकळ्या जंगलातील त्याची डरकाळी भीतीदायक असते. मात्र, अशाही परिस्थितीत केवळ त्याची एक झलक दिसावी म्हणून पर्यटक कोळशात वनभ्रमंती करतात. यावर्षी हिवाळ्यात व आता उन्हाळ्याची चाहूल लागताच त्याने दर्शन देणे सुरू केले आहे. सर्किट व येडा अण्णा या दोन टोपण नावांचे वाघ ताडोबा वनपरिक्षेत्रात आहेत. येडा अण्णा याला दि किंग ऑफ ताडोबा, असे म्हटले जाते. ताडोबात तो सदैव भ्रमंतीवर असतो. अण्णा अतिशय चपळ असून शिकार दिसताच त्याच्यावर लपकतो, तर गब्बर आणि अमिताभ हे ताडोबाचे मुख्य आकर्षण बनलेले आहे.
मोहुर्ली व ताडोबाच्या पाणवठय़ांवर गब्बर व अमिताभची हमखास भेट होते. शोलेतील अमिताभ विरुध्द गब्बर, अशी लढाई येथेही होतांना दिसते. आज पर्यटक ताडोबात येतात तेव्हा त्यांच्या तोंडी शिवाजी, कतरिना, सर्किट, येडा अण्णा, गब्बर, अमिताभ या वाघांच्या टोपण नावांचा उल्लेख हमखास असतो. या प्रकल्पातील गाईड व नेहमीच्या पर्यटकांसाठी वाघ-वाघिणी यांना त्यांच्या सवयी व शारीरिक खूणांनुसार नावे ठेवण्यात आलेली आहेत. ताडोबात व्याघ्रदर्शन झाले अन् बाहेर पडलात की, चर्चा सुरू होते ती वाघांचे कुटुंब व त्यांच्या गमतीदार नावांचीच.
संग्रहित लेख, दिनांक 12th Feb 2014 रोजी प्रकाशित
ताडोबातही आहेत शिवाजी, कतरिना, सर्किट, येडा अण्णा, गब्बर, अमिताभ
शिवाजी, कतरिना, सर्किट, येडा अण्णा, गब्बर, अमिताभ ही आहेत जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पट्टेदार वाघांची नावे. व्याघ्र भ्रमंतीसाठी जगभरातून येणाऱ्या पर्यटकांनी या पट्टेदार वाघांना दिलेली ही टोपण नावे आहेत. या नावांनीच आज ताडोबातील वाघ ओळखले जात आहेत.
First published on: 12-02-2014 at 08:58 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivaji katrina sarkit yeda anna gabbar and amitabh in tadoba