ठाण्यासारख्या बालेकिल्ल्यात शिवसेना उमेदवाराचा पाडाव करीत महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना आव्हान उभे करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने येत्या १८ जानेवारीला होणाऱ्या पोटनिवडणुकीत मात्र शिवसेनेसोबत समझोत्याचे राजकारण सुरू केले असून वागळे इस्टेट परिसरातील मतदारसंघात उमेदवार उभे करायचे नाहीत, असा निर्णय पक्षाने घेतला आहे. समझोत्याचे गणित जुळविताना स्थायी समितीचे यंदाच्या वर्षीचे सभापतिपद भाजपला मिळावे, असा प्रस्ताव शिवसेना नेत्यांपुढे ठेवण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्य़ातील १८ जागांपैकी सर्वाधिक सात जागांवर विजय मिळवीत विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेला मोठा धक्का दिला. ठाणे जिल्ह्य़ात सर्वाधिक जागा पटकावून सत्तेचा सोपान गाठायचा असे बेत शिवसेना नेतृत्वाने आखले होते. मात्र कल्याण पट्टीतील महत्त्वाच्या जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. ठाणे शहर मतदारसंघासारखा बालेकिल्लाही भाजपने शिवसेनेकडून हिरावून घेतला. या मतदारसंघात शिवसेनेचे नगरसेवक असलेल्या प्रभागांमध्ये भाजपने मोठी आघाडी घेतल्याने हा पराभव सेना नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे. असे असताना येत्या १८ जानेवारी रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजपची भूमिका काय असेल, याविषयी येथील राजकीय वर्तुळात कमालीचे औत्सुक्य होते.
भाजपची नमती भूमिका
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठय़ा यशामुळे ठाणे जिल्ह्य़ात शिवसेनेपुढे आव्हान उभे करण्यासाठी भाजप तात्काळ काही पावले उचलेल, असे अंदाज बांधले जात होते. मंत्रिमंडळाच्या रचनेत पहिल्या टप्प्यातच जिल्ह्य़ातील एखाद्या आमदाराची वर्णी लागेल, असेही बोलले जात होते. मात्र जिल्ह्य़ातील एकाही आमदाराच्या वाटय़ाला आतापर्यंत लाल दिवा आलेला नाही. ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्रिपद भाजपला मिळावे यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा दबाव होता. विनोद तावडे यांची या पदावर नियुक्ती करून शिवसेनेला धक्का दिला जाईल, असेही बोलले जात होते. मात्र पालकमंत्रिपदी एकनाथ िशदे यांच्या नावाची घोषणा झाल्याने भाजपचा फुगा फुटल्याची चर्चा आता रंगली आहे. या पाश्र्वभूमीवर एकनाथ िशदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघात होणाऱ्या तीन पोटनिवडणुकांमध्ये भाजप कोणती भूमिका घेते याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. काँग्रेस नगरसेवक रवींद्र फाटक, जयश्री फाटक, कांचन चिंदरकर या नगरसेवकांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या या प्रभागांमध्ये निवडणूक होत आहे. या प्रभागांमध्ये शिवसेनेची ताकद असली तरी भाजपने उमेदवार उभे केले असते तर निवडणुकीत अधिक रंग भरले असते. मात्र रविवारी रात्री शिवसेना-भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनुसार या मतदारसंघात भाजपचे उमेदवार उभे करायचे नाहीत, असे ठरल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढावे यासाठी शहर कार्यकारणीमार्फत इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे काम सुरू असले तरी शिवसेनेविरोधात निवडणूक लढविण्याचे ठरलेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. यासंबंधी भाजपचे आमदार संजय केळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महापालिकेत शिवसेना-भाजपची पूर्वीपासून युती आहे, त्यामुळे पोटनिवडणुकीत ही युती कायम राखण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे सांगितले.
दोन वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीत मात्र जागावाटपाच्या चर्चेनंतर काय तो निर्णय घेता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्यासोबत माझी चर्चा झाली आहे. त्यानुसार महापालिकेतील सत्तावाटपात शिवसेना दिलेला शब्द पाळेल, असे सूचक वक्तव्यही केळकर यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 30th Dec 2014 रोजी प्रकाशित
ठाण्यातील पोटनिवडणुकीत सेना-भाजपचे मनोमीलन
ठाण्यासारख्या बालेकिल्ल्यात शिवसेना उमेदवाराचा पाडाव करीत महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना आव्हान उभे करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने

First published on: 30-12-2014 at 06:40 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena bjp come together for thane election