लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या निर्भेळ यशानंतर राज्यात युतीच्या सत्तावाटपात समान वाटा मिळावा, या भाजपच्या मागणीला वाकुल्या दाखविणाऱ्या शिवसेनेने आता ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाड या भाजपच्या जागेवर दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपच्या वाटेने निघालेले मुरबाडचे स्थानिक आमदार किसन कथोरे यांची कोंडी करायची आणि भाजपलाही शह द्यायचा, अशी दुहेरी रणनीती शिवसेनेच्या गोटात आखली असून यामुळे ठाणे जिल्ह्य़ाच्या ग्रामीण पट्टय़ात या दोन पक्षांमध्ये कमालीचे वितुष्ट निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. कथोरेंसारखा मोहरा हाती लागल्यामुळे भाजपचा मुरबाडवरील दावा खरेतर आणखी प्रबळ झाला आहे. असे असताना ठाणे जिल्ह्य़ातील शिवसेनेच्या एका बडय़ा नेत्याने स्थानिक नेतृत्वास हाताशी धरून ‘मुरबाड-बदलापूर आमचेच’, असे दबावतंत्र सुरू केले आहे.
ठाणे-पालघरमधील २४ जागांपैकी युतीच्या सत्तावाटपात आधीच भाजपच्या वाटय़ास अवघ्या सात जागा आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर बदललेल्या सत्तासमीकरणात भाजपने कल्याण पश्चिम या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर दावा सांगितला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत या मतदारसंघातून शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला सोडण्यास सेना तयार नाही. कल्याण, अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्यांतील सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी बदलापूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन मुरबाड मतदारसंघासंबंधी भावना जाहीरपणे व्यक्त केल्या. त्यामुळे या दोन मित्र पक्षांमधील धुसफुस आणखी वाढली आहे.
गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव पत्कारावा लागल्याने भाजपने या जागेवरील हक्क सोडावा, अशी रीतसर मागणीच सेनेच्या तिन्ही तालुकाप्रमुखांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आयात उमेदवार लादण्याचा प्रयत्न केल्यास ‘मैत्रीपूर्ण लढत देण्याचा इशाराही सेनेने भाजपला दिला आहे. गेल्या महिन्यात राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपच्या वाटेवर असलेले स्थानिक आमदार किसन कथोरे यांची कोंडी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानले जाते. शिवसेनेकडून या मतदारसंघातून शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी जाहीरपणे निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कथोरे राष्ट्रवादीत असते तर त्यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार म्हणून शिवसेनेचा या मतदारसंघातील दावा अधिक प्रबळ ठरला असता. मात्र कथोरेंच्या खेळीमुळे शिवसेना आणि म्हात्रे असे दोघेही अडचणीत आले. किसन कथोरे यांनी राष्ट्रवादीस सोडचिठ्ठी दिली असली तरी अद्याप त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. राष्ट्रवादी सोडल्यानंतर त्यांनी भाजपच्या काही नेत्यांशी गाठीभेटी घेतल्या. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या सेनेच्या स्थानिक नेत्यांनी निकराची भूमिका घेत भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे राष्ट्रवादीनेही कार्यकर्ता मेळावा भरवून कथोरेंविरोधात शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्री गणेश नाईक, सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, माजी आमदार गोटीराम पवार आदी याप्रसंगी उपस्थित होते
संग्रहित लेख, दिनांक 16th Sep 2014 रोजी प्रकाशित
बदलापूरमध्ये सेनेची भाजपला सोडचिठ्ठी?
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या निर्भेळ यशानंतर राज्यात युतीच्या सत्तावाटपात समान वाटा मिळावा
First published on: 16-09-2014 at 06:10 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena will alone stand in vidhansabha election in badlapur