कल्याण-डोंबिवली पालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी मंगळवारी शिवसेना-मनसे या तुल्यबळ गटांमध्ये चुरशीची लढत झाल्याने अनुचित प्रकार टाळण्यासाठी पालिकेत मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कल्याण-डोंबिवली शहरातील नागरी समस्यांविषयी चर्चा करण्याऐवजी लोकप्रतिनिधी स्वार्थी हेतूने घोडेबाजारात दंग असल्याचे चित्र मंगळवारी दिसले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थायी समितीच्या प्रत्येक सदस्याच्या मताचा भाव ५० लाख रुपये असल्याचे बोलले गेले. रात्रभर हा बाजार सुरू होता.  
 दोन्ही गटांत बाहुबलींची संख्या अधिक असल्याने पालिका मुख्यालयात प्रत्येक माणसागणिक पोलीस ठेवण्यात आला होता. भाजपकडून बेपत्ता झाल्याचा आरोप झालेल्या नगरसेविका अर्चना कोठावदे मतदानासाठी येणार असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पोलिसांसमोर होता.
पालिकेच्या आवाराबाहेर पत्रीपूल ते शिवाजी चौक आणि शिवाजी चौक ते लालचौकी दरम्यान पक्षीय बॉडीगार्डाच्या मोठय़ा प्रमाणात गाडय़ा लावण्यात आल्या होत्या. शिवसेना, मनसेकडून उपस्थित असलेली ही तरुण बाहुबली मंडळी पालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर गटागटाने ‘आदेशाची’ वाट पाहत उभी होती.
स्थायी समिती सभागृहात प्रथमच पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला होता. जनसंपर्क अधिकारी प्रसाद ठाकूर यांच्या निष्क्रिय भूमिकेमुळे पत्रकारांवर ही वेळ आल्याने, त्यांच्या निषेधाच्या घोषणा या वेळी देण्यात आल्या. त्यांचे पद काढून घेण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात येणार आहे. सभागृहाबाहेर शिवसेना, मनसेच्या महिला कार्यकर्त्यां, कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणात होत्या.
त्यामुळे पोलिसांनी प्रत्येकाला दालनाबाहेर हटवण्यासाठी बळाचा वापर केला. शिवसेनेकडून विजयाचा जयघोष सुरू होता. मनसेने शांतता पाळली होती. सभेला सुरुवात होण्यापूर्वी मनसेच्या दालनातून भाजपच्या अर्चना कोठावदे यांना मनसेच्या नगरसेविका सरोज भोईर, वैशाली दरेकर व इतर नगरसेवकांनी कडे करून सभागृहात नेण्याचा प्रयत्न केला. या वेळी शिवसेना, भाजपच्या नगरसेविकांनी कोठावदे यांच्या हातात मतदानासाठीचा पक्षादेश देण्याचा प्रयत्न केला. तो दालनासमोरील गर्दीत फाडला गेला. या वेळी कोठावदे यांना शिवसेनेच्या नगरसेविकांकडून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला.
भाजपचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या सूचनेवरून अर्चना कोठावदे यांना स्थायी समिती सदस्यपद मिळाल्याने त्यांची समजूत काढण्यासाठी सकाळपासून खडसे पालिकेत हजर होते. पण कोठावदे यांना ते भेटू शकले नाहीत. आमदार एकनाथ शिंदे, गोपाळ लांडगे पक्षीय व्यूहरचना आखण्यात व्यग्र होते. स्थायी समिती सदस्य नसलेले सर्व पक्षीय नगरसेवक पालिकेत सभापती पदावरून सुरू असलेल्या घाणेरडय़ा राजकारणाविषयी खासगीत तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसत होते.