शिवसेनेच्या हाती सत्ता येत नाही, आता येथे काही राम उरलेला नाही याची जाणीव होताच काँग्रेसच्या कळपात सामील झालेले माजी मंत्री नारायण राणे यांना कोकणातील मतदारांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अस्मान दाखवले. स्वत:च्याच मतदारसंघात पराभवाला सामोरे जाण्याचा प्रसंग राणे यांच्यावर ओढवला. राणे यांच्या या पराभवामुळे त्यांचे राजकीय नुकसान झाले असले, तरी ठाणे जिल्ह्य़ातील आदिवासींना मात्र चांगलाच लाभ झाला आहे. त्यांना तब्बल ८०० पादत्राणांचे जोड प्राप्त झाले आहेत. ही कमाल आहे एका शिवसैनिकाच्या शपथपूर्तीची!
अरविंद भोसले. वरळीत राहणारे कट्टर शिवसैनिक. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांची नितांत श्रद्धा. त्यामुळेच २००५ मध्ये राणे यांनी केलेले पक्षांतर भोसले यांना चांगलेच झोंबले. त्यांनी त्याचवेळी शपथ घेतली की, राणे यांचा निवडणुकीत पराभव होत नाही तोपर्यंत पादत्राणांचा त्याग करायचा. १९ ऑक्टोबर २०१४ रोजी भोसले यांची शपथपूर्ती झाली. वस्तुत: लोकसभा निवडणुकीत राणे यांचा मुलगा नीलेश याचा पराभव झाला त्याचवेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भोसले यांना पादत्राणे घालण्याची सूचना एका कार्यक्रमात केली होती. त्यामुळे कोकणातील शिवसैनिकांनी त्यांना पादत्राणांचे जोड भेट म्हणून दिले. पादत्राणांचे तब्बल ४५० जोड त्यांच्या वरळी येथील घरी पोहोचले होते. मात्र, आपली शपथ पूर्ण होत नाही तोपर्यंत चप्पल वापरणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीमध्ये कोकणातील मतदारांनी नारायण राणे यांना पराभवाची धूळ चारली आणि अरविंद भोसले यांची शपथ पूर्ण झाली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कणकवली, कुडाळ, मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी, तसेच मुंबईतील असंख्य शिवसैनिकांनी गेल्या काही दिवसांत अरविंद भोसले यांना मोठय़ा संख्येने पादत्राणांचे जोड पाठवून दिले. दिवाळीच्या सुमारास त्यांच्याकडे पादत्राणांचे ८०० हून अधिक जोड जमा झाले. इतक्या पादत्राणांचे काय करायचे असा प्रश्न त्यांना पडला होता. आदिवासी भागात कार्यरत असलेल्या मातृभूमी सेवा चॅरिटेबल ट्रस्टशी त्यांनी तात्काळ संपर्क साधला आणि पादत्राणांचे ८०० जोड आदिवासींसाठी पाठवून दिले. वाडा, इगतपुरी, कसारा परिसरात रानावनात अनवाणी फिरणाऱ्या आदिवासींमध्ये या पादत्राणांचे वाटप करण्यात आले. काटय़ाकुटय़ातील वाट तुडविणाऱ्या अनवाणी पायांना नवी कोरी चप्पल लाभल्याने ऐन दिवाळीमध्ये आदिवासींच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.