राज्यातील सर्व मल्टीप्लेक्समध्ये प्राईम टाईमला मराठी चित्रपट दाखविण्याचे बंधनकारक केल्यानंतर शोभा डे यांनी मल्टीप्लेक्समध्ये आता पॉपकॉर्नऐवजी दहीमिसळ व वडापाव खायला मिळेल, असे मत नोंदवणे त्यांना शोभणारे नव्हते. वडापाव आणि दहीमिसळचा आस्वाद केवळ मराठी चित्रपटातील नाही तर हिंदी चित्रपटातीलही कलावंत घेत असतात. त्यामुळे मराठी चित्रपट, मराठी भाषेचा व मराठी माणसाचा अवमान होईल, असे विधाने त्यांनी करू नये, असे मत ज्येष्ठ अभिनेते आणि अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केले.
‘दोन दिवस’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने ते नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. मराठी चित्रपटाचा दर्जा सुधारला असून ऑस्कपर्यंत तो गेला आहे. प्राईम टाईमला मराठी चित्रपट बंधनकारक करण्यात आले तर तिला मराठीला तुच्छ लेखण्याचे कारण नाही. प्रसिद्धीसाठी विधान केले असेल तर ते चुकीचे आहे. अनेक हिंदी चित्रपटातील अभिनेते आणि दिग्दर्शक मराठी चित्रपटाची निर्मिती करीत आहे. वडापाव आणि दहीमिसळचा आस्वाद केवळ मराठीच घेत नाही. मुंबईतला प्रत्येक माणूस घेतो. हे डे यांना माहिती नसणार. त्या सुद्धा मराठी भाषिक आहे. त्यामुळे त्यांनी केलेले विधान त्यांच्यादृष्टीने योग्य असले तरी ते मराठी भाषिकांच्या आणि कलावंतांच्या दृष्टीने चुकीचे आहे. संमेलन म्हटले की काही वाद असतात. मात्र, बेळगावचे संमेलन चांगले झाले. नागपुरात नाटय़ संमेलन आयोजित केले जाईल. तसा प्रस्ताव आहे. मात्र, त्या संदर्भात निर्णय हा परिषदेच्या बैठकीत सर्वसंमतीने घेतला जातो. कोल्हापूर ही पूर्वी चित्रनगरी होती.मात्र, तेथील स्टुडिओ बंद झाले आहे. नागपूरमध्ये चित्रपटासाठी चांगले वातावरण आहे. त्यामुळे मुंबईसोबत नागपूर हे चित्रपटासाठी केंद्र होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.