बालकांना त्यांचे हक्क व संरक्षण प्राप्त करून देण्यासाठी कोणत्या बालहक्काची पायमल्ली होते याची काळजी घेण्याची गरज आहे, असे मत प्रा. अंबादास मोहिते यांनी व्यक्त केले. नागरिक शिक्षण मंडळ संचालित भैयाजी पांढरीपांडे नॅशनल इन्स्टिटय़ुट ऑफ सोशल वर्कच्यावतीने ‘बाल श्रमिकांबाबत समाज कार्याचा दृष्टिकोण’ या विषयावर दोन दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले.
विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे पुरस्कृत या चर्चासत्राचे उद्घाटन नागरिक शिक्षण मंडळाचे सदस्य श्याम देऊळकर यांच्या अध्यक्षतेखाली तर म्यूर मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉ. विलास शेंडे यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स (मास्वे) व दिल्ली येथील ‘हक’ संस्थेच्या बाल संरक्षण प्रकल्पाचे प्रमुख शहाबाज खान शेरवानी विशेषत्वाने उपस्थित होते. चर्चासत्राचे समन्वयक प्रा. अनिल सरगर यांनी संशोधनातून मांडली गेलेली बालकांची स्थिती, आकडेवारी आणि शासकीय कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा संदर्भ देत मुलांचे शोषण, उपेक्षा व र्दुव्यवहारापासून संरक्षण यावर चर्चासत्रात विचारमंथन व्हावे, अशी भूमिका मांडली.
डॉ. विलास शेंडे यांनी उद्घाटनपर भाषणात रस्त्यावर भटकणारी मुले आणि बाल श्रमिकांच्या समस्या व परिस्थिती निदर्शनास आणून दिली. तसेच या संदर्भात समाजकार्याचा दृष्टिकोण प्रगल्भ करून या मुलांमध्ये राहून, त्याच्या क्षमता ओळखून त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी काम करण्याचे आवाहन केले. बाल कामगारांना केंद्रस्थानी ठेवून बालकांना त्यांचे हक्क व संरक्षण प्राप्त करून देण्यासाठी कोणत्या बालहक्काची पायमल्ली होते याची अभ्यासकांनी आणि कार्यकर्त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे, असे मत प्रा.अंबादास मोहिते यांनी बीजभाषणात व्यक्त केले. अध्यक्ष श्याम देऊळकर यांनी रस्त्यावरील मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, असे सुचवले. प्राचार्य डॉ. एल.एस. तुळणकर यांचे स्वागतपर भाषण झाले.
दिल्ली येथील हक संस्थेचे शेरवानी, प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिर शालेचे संचालक श्रीकांत आगलावे, डॉ. जॉन मेनाचेरी, फादर हेरॉल्ड डिसूझा, डॉ. शैलेश पानगावकर, छाया गुरव आणि अॅड. प्रशांत गोडे इत्यादींनी बाल श्रमिकांच्या समस्यांवर प्रकाश टाकला. चर्चासत्रात एकूण २१ शोधनिबंध सादर करण्यात आले असून दिल्ली, महाराष्ट्र आणि इतर राज्यातील ९४ प्राध्यापक आणि मुलांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.