कृषी कर्जमाफी घोटाळ्यातील अयोग्य पद्धतीने कर्जमाफी केल्याप्रकरणी जिल्ह्य़ातील ३११ सचिवांना आज जिल्हा निबंधकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.     
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्जमाफी घोटाळा प्रकरण गाजत आहे. त्याची फेरतपासणी नाबार्डच्या माध्यमातून होत आहे. पंधरा दिवसांपूर्वी बँकेच्या दोघा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेहोते. आता सेवा संस्थांच्या ३११ सचिवांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. कर्जमाफीची कागदपत्रे अयोग्य पद्धतीने बनवून कर्ज मंजुरी करण्यात सचिवांचा सहभाग आहे, असा ठपका ठेवून त्यांनानिबंधक सचिन शिपूरकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.    
दरम्यान अपात्र कर्ज प्रकरणात ज्या संस्था अडकल्या आहेत, त्या संस्थेतील संचालकांना अन्य संस्थांमध्ये संचालक होता येणार नाही, असे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे अनेक संस्थांत संचालकपद भूषविणाऱ्यांची आता गोची होणार आहे.