हजारो गुंतवणूकदारांना कोटय़वधींचा गंडा घालणाऱ्या ‘श्री सूर्या’च्या समीर आणि पल्लवी जोशी यांना फसवणुकीत मदत केल्याप्रकरणी दिलीप डांगे, श्रीकांत प्रभुणे आणि निशिकांत मायी या तीन दलालांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारवाईमुळे श्रीसूर्या समूहाच्या दलालांमध्ये खळबळ उडाली आहे.
‘श्री सूर्या’ समूह समीर आणि पल्लवी जोशी यांनी निर्माण केला असून या समूहात कमिशन एजंट म्हणून शेकडो दलालांची नियुक्ती केली. हे दलाल सर्वसामान्य नागरिक, निवृत्त कर्मचारी आणि नोकरपेशांना हेरून त्यांना श्रीसूर्या समूहात रक्कम गुंतविण्यास बाध्य करीत होते. दोन ते अडीच वर्षांत दुप्पट रक्कम मिळत असल्याचे सांगून या दलालांनी अनेकांच्या आयुष्याची मिळकत श्रीसूर्या समूहाच्या माध्यमातून समीर जोशीच्या तिजोरीत ओतली. घेतलेली रक्कम परत करण्याऐवजी समीर जोशी टाळाटाळ करू लागला. पर्यायाने गुन्हे शाखेकडे त्यासंबंधी तक्रारी झाल्या. समीर जोशी आणि त्याची पत्नी पल्लवी यांच्याविरुद्ध प्रतापनगर ठाण्यात १४ सप्टेंबर २०१४ ला या प्रकरणी गुन्हे दाखल केले आणि त्यानंतर महिनाभराने त्यांना अटक करण्यात आली. नागपूरशिवाय अमरावती, अकोला आणि पुण्यातही जोशी दाम्पत्य आणि त्यांच्या दलालाविरुद्ध गुन्हे दाखल झाले. त्यांनाही अटक करण्यात आली. नागपुरातील दलालांविरुद्ध पुरावे गोळा करत असून पोलीस निरीक्षक विष्णू भोये आणि निरीक्षक चौधरी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह काही दलालांच्या निवासस्थानी व कार्यालयात धडक दिली. यात दिलीप डांगे, श्रीकांत प्रभुणे आणि निशिकांत मायी या तीन दलालांना अटक करण्यात आली.