गोड आणि पहाडी आवाज ही ज्यांची वैशिष्टय़े होती, त्या मोहम्मद रफी यांना आदर्श मानणाऱ्या गायकांची संख्या आजही लक्षणीय आहे. या रफीप्रेमी गायकांमधील आघाडीचे नाव म्हणजे श्रीकांत नारायण. रफींची शैली आत्मसात करणाऱ्या या गायकाच्या परिश्रमांना ‘लिम्का बुक आँफ रेकाँर्ड’ने दाद दिली आहे. गेल्या वर्षी सलग १२ तास रफी यांची गाणी गाण्याची करामत करणाऱ्या श्रीकांतचा हा विक्रम आता ‘लिम्का बुक’मध्ये नोंदवला गेला आहे. श्रीकांतला बुधवारी ‘लिम्का’कडून याबाबतचे प्रमाणपत्र मिळाले.
महाविद्यालयीन जीवनापासून रफी यांची गाणी गाणाऱ्या श्रीकांतने गेल्या १० वर्षांत रफीगीतांचे शंभरहून अधिक कार्यक्रम केले आहेत. त्यातील एक प्रमुख कार्यक्रम म्हणजे ‘फिर रफी’. ‘फिर रफी’च्याच माध्यमातून रफींना आगळीवेगळी आदरांजली वाहण्याच्या ध्यासाने झपाटलेल्या श्रीकांतने २५ डिसेंबर २०१२ रोजी सलग १२ तास रफी यांची गाणी सादर करण्याचा संकल्प सोडला. या कार्यक्रमात श्रीकांतने दुपारी १२ ते रात्री १२ या वेळात रफी यांची तब्बल १०१ गाणी गायली. यात ७० एकल गाणी होती. ही गाणी निवडण्यासाठी त्याला राजेश सुब्रमण्यम या मित्राची मदत झाली. श्रीकांतच्या या प्रयत्नाला प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसाद लाभला. रंगशारदा तर तुडुंब भरले होतेच; मात्र सभागृहाबाहेर लावलेल्या दोन मोठय़ा पडद्यांवर हा कार्यक्रम पहाण्यासाठी गर्दी उसळली होती. ‘लिम्का’च्या संपादिका विजया घोसे यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र बुधवारी श्रीकांतच्या हाती पडले आणि त्याची अवस्था ‘नाचे मन मोरा’ अशीच झाली.