सोलापूरचे ग्रामदैवत सिध्देश्वर महाराजांच्या यात्रेला शनिवारी सकाळी नंदीध्वजांच्या भव्य मिरवणुकीने प्रारंभ झाला. साडेआठशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेच्या पहिल्या दिवशी शहराच्या पंचक्रोशीत सिध्देश्वर महाराजांनी प्रतिष्ठापना केलेल्या ६८ लिंगांना नंदीध्वजांच्या मिरवणुकीद्वारे तैलाभिषेक (यण्णीमज्जन) करण्यात आला. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रातून लाखो भाविक सोलापुरात दाखल होत आहेत.
उत्तर कसब्यातील मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू वाडय़ातून सकाळी ८.३० वाजता केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते नंदीध्वजांची पूजा करण्यात आल्यानंतर उत्साही आणि भक्तिमय वातावरणात नंदीध्वजांच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. या वेळी उज्ज्वला शिंदे यांच्यासह आमदार कु. प्रणिती शिंदे, महापौर अलका राठोड, सिध्देश्वर मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मेघराज काडादी, धर्मराज काडादी, आमदार विजय देशमुख, माजी आमदार विश्वनाथ चाकोते आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी, शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मानाच्या पहिल्या दोन नंदीध्वजांना साज चढविण्यात आला होता. उर्वरित विविध समाजाचे मान असलेले पाच नंदीध्वज सकाळी हिरेहब्बू वाडय़ात आणले गेले. विविध पारंपरिक मार्गावरून ही मिरवणूक हळू हळू दुपारी सिध्देश्वर मंदिरात पोहोचली.
या मिरवणुकीत पूर्वापार परंपरेनुसार हिरेहब्बूंनी श्री सिध्देश्वरांचा योगदंड धरला होता. सिध्देश्वर मंदिरात ‘श्री’ च्या मूर्तीला तैलाभिषेक झाल्यानंतर शहराच्या पंचक्रोशीतील ६८ लिंगांना तैलाभिषेक घालण्यासाठी ही मिरवणूक मार्गस्थ झाली. सात नंदीध्वजांमध्ये पहिला नंदीध्वज सिध्देश्वर देवस्थानाचा, दुसरा देशमुख घराण्याचा, तिसरा लिंगायत माळी समाजाचा, चौथा व पाचवा विश्व ब्राह्मण समाजाचा तर सहावा व सातवा नंदीध्वज मातंग समाजाचा असतो.
हलग्यांचा कडकडाट, संगीत बॅन्ड पथकांचा सुमधुर निनाद, सनई-चौघडय़ांचा मंगलमय स्वर, भाविकांमधून उत्स्फूर्तपणे होणारा श्री सिध्देश्वराचा जयजयकार अशा उत्साही वातावरणात निघालेल्या नंदीध्वजांचे मानकरी व शेकडो भाविकांनी पूर्वापार परंपरेनुसार परिधान केलेले पांढऱ्या शुभ्र बारा बंदीचा पोशाख मिरवणुकीच्या मांगल्याची साक्ष देत होते. रात्री उशिरा ही मिरवणूक उत्तर कसब्यात हिरेहब्बू वाडय़ात परत येऊन विसर्जित झाली. मात्र यंदा मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांचा त्रास सर्वाना झाला. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम महापालिका यंत्रणेने जुजबी स्वरूपात केल्याचे दिसून आले. त्याबद्दल भाविक तथा नागरिकांत नाराजी व्यक्त करण्यात आली.
सिध्देश्वर यात्रेनिमित्त मंदिर परिसरात तसेच पंचकट्टा व होम मैदानावर विविध करमणुकीची, खेळण्यांची, खाद्यपदार्थाची दालने उभारण्यात आली आहेत. डिस्ने लॅन्ड ही या यात्रेची वैशिष्टय़े आहेत. भाविकांच्या व आबालवृध्द नागरिकांच्या गर्दीने यात्रा फुलून गेली आहे. यात्रेनिमित्त सिध्देश्वर मंदिरास नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिर व तलाव परिसर सजला आहे.
तीस क्विंटल भाकरी
सिध्देश्वर देवस्थान अन्नछत्रातर्फे यात्रेनिमित्त दररोज पाच ते सहा हजार भाविकांना महाप्रसाद देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी गेल्या १ जानेवारीपासूनच भाकरी बनविण्याचे काम महिलांच्यामार्फत करण्यात येत आहे. तीस क्विंटल ज्वारी आणि बाजरीच्या भाकरी तयार करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे नंदीध्वज मानकऱ्यांसाठी लाडू आणि चिवडा देण्याचीही व्यवस्था समितीतर्फे करण्यात आली आहे.
आज अक्षता सोहळा
उद्या रविवारी सिध्देश्वर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता सिध्देश्वर मंदिरालगत संमती कट्टय़ावर अक्षता सोहळा संपन्न होणार आहे. सिध्देश्वर महाराजांशी एका कुंभारकन्येने विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु सिध्देश्वर महाराजांनी त्यास नकार देत आपल्या योगदंडाशी विवाह करण्यास संमती दिली होती. या घटनेच्या स्मृती म्हणून प्रतीकात्मक विवाह सोहळ्यातील अक्षता टाकल्या जातात. यावेळी लाखो भाविकांची उपस्थिती असते. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे आपल्या कुटुंबीयांसह या अक्षता सोहळ्यात सहभागी होणार आहेत.