मागील चार ते पाच महिन्यांपासून शहर अतितीव्र टंचाईशी झुंजत असताना त्यातच दुष्काळाची भर पडली. याचा परिणाम आता शहरातील व्यापार, उद्योगावर होऊ लागला असून मंदीच्या सावटाखाली व्यापारी, व्यावसायिक, लघू उद्योग कसेबसे तग धरण्याचा प्रयत्न करीत आहेत.
टंचाईमुळे विकास कामे ठप्प झाली आहेत. ज्या कामांना सुरूवात करण्यात आली होती, ती कामे अर्धवट अवस्थेत पडून असून नवीन कामांना सुरूवात करण्याचे धाडस कोणी करीत नाही. तालुक्यात दुष्काळी परिस्थिती अधिक गडद होत चालली आहे. शहर परिसरातील ग्रामीण भागाचा उद्योग व्यवसाय आणि व्यवहाराच्या निमित्त मनमाडशी नेहमीच आर्थिक संबंध जोडला जातो, परंतु यंदा दुष्काळामुळे आर्थिक आवक-जावक मंदावली आहे. बाजारपेठेवर आर्थिक मंदीचे सावट असून अशा वातावरणात नव्या आर्थिक वर्षांची सुरूवात निराशाजनक झाली. तीन ते चार महिन्यापासून शहराची आर्थिक उलाढाल जेमतेम असल्याचे सांगितले जाते. रविवारची साप्ताहिक सुटी, एक एप्रिलला बँकांचे नव्या वर्षांसाठीचे अंतर्गत कामकाज, यानंतर बँका सुरू झाल्यानंतर शहर व परिसरातील बँकांमध्ये ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. बहुतेक सर्वच एटीएममध्ये पैसा शिल्लक नसल्याचे बोर्ड झळकल्याने नागरिकांचे हाल झाले. रविवारी सुटीमुळे बँका बंद होत्या तर सोमवारी एक एप्रिलला नव्या आर्थिक व्यवहाराला प्रारंभ झाला. ‘मार्च एंड’ची लगबग आणि नव्या आर्थिक वर्षांला सुरूवात यामुळे दोन दिवस बाजारपेठेतील अर्थव्यवस्थेच्या नाडय़ा-आखडल्या होत्या. अगदी छोटे व्यावसायिकही मार्च एंड चे कारण सांगत होते. त्यामुळे मंदीचे सावट होते. मंगळवारपासून बँकांचे कामकाज पूर्ववत सुरू झाले खरे पण दोन दिवस आíथक व्यवहार ठप्प असल्याने सर्वच बँकांमध्ये गर्दी उसळली विविध शासकीय कार्यालयांचे पगार बँकांमार्फत होतात. शिवाय अनेक बँकांच्या एटीएम केंद्रातील पैसेही संपले त्यामुळे प्रामुख्याने रेल्वे व बसने बाहेरगावहून येणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.  ज्या व्यावसायिकांनी कर्ज काढून व्यवसाय सुरू केले, त्यांना उत्पन्न तर दूर, परंतु त्यांच्या कर्जात वाढ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.