वन विभागाने राज्यात शंभर कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली असताना दुसरीकडे जंगलातील सागवानावर कुऱ्हाड घालण्यासाठी तस्कर देखील सरसावल्याचे पुढे आले आहे. नाशिक वनवृत्ताचा विचार करता मागील साडे तीन वर्षांत तस्करांनी थोडी थोडकी नव्हे तर, सुमारे दोन कोटी रूपये किंमतीची सहा हजार वृक्षांची तोड केल्याचे उघड झाले आहे. याच कालावधीत पावणे दोन कोटी रूपयांचे लाकूड वन विभागाने जप्त केले. अवैध वृक्षतोड आणि पकडले जाणारे लाकूड यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास या क्षेत्रातून तस्करांनी मोठय़ा प्रमाणात लाकूड चोरून नेल्याचे स्पष्ट झाले आहे.
नाशिक वनवृत्तात पूर्व नाशिक, मालेगाव उपविभाग, पश्चिम नाशिक, अहमदनगर आणि संगमनेर उपविभाग यांचा समावेश होतो. गुजरातलगत असणाऱ्या पेठ व सुरगाणा तालुक्यात तर काही वर्षांत सागवानाची मोठय़ा प्रमाणात तोड होत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी वन विभागाने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या असल्या तरी तस्करांनी काही स्थानिकांना हाताशी धरून वृक्षतोडीचे सत्र अव्याहतपणे सुरू ठेवले आहे. साडे तीन वर्षांत सर्वाधिक वृक्षतोड २०११ मध्ये झाली. या एकाच वर्षांत २२९४ वृक्ष तोडण्यात आले. त्याआधीच्या वर्षांत हे प्रमाण १९३० इतके होते. २०१२ मध्ये हा आकडा १११७ वर आला तर मार्च २०१३ पर्यंत जंगलातील ६०५ वृक्ष तोडण्यात आली. तस्करांनी या माध्यमातून जंगलातील जवळपास १५०० घनमीटर लाकडाची चोरी केली. त्याची किंमत एक कोटी ९२ लाख ३२ हजार ४०३ रूपये असल्याचे खुद्द वन विभागाने म्हटले आहे.
अवैध वृक्षतोड होऊ नये म्हणून वन विभागाने दक्षता व गस्ती पथक, तपासणी नाके आणि संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू ठेवले आहेत. स्थानिक ग्रामस्थांवर जंगलाची राखण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. त्याचा परिपाक अवैध वृक्षतोडीचे प्रमाण कमी होण्यात झाल्याचा दावा वन विभागाने केला आहे.
उपरोक्त काळात ९१२ घनमीटर लाकूड नाशिक वनवृत्त क्षेत्रात पकडण्यात यश मिळाले. त्याची किंमत जवळपास पावणे दोन कोटी रूपये आहे. परंतु, त्यात अवैधपणे तोडलेल्या, पण वनक्षेत्रात पडून राहिलेल्या लाकडाचाही समावेश आहे. त्यामुळे हे लाकूड तस्करीसाठी नेण्यापूर्वी वन विभागाच्या हाती लागल्याची अधिक शक्यता आहे. याचाच दुसरा अर्थ तस्करांनी जी वृक्षतोड केली, त्यातील बरेचसे लाकूड त्यांनी चोरटय़ा मार्गाने नेले. वन विभागाने दिलेल्या दोन्ही आकडेवारीचा अभ्यास केल्यास तस्करांकडून जंगलातील सागवानाची मोठय़ा प्रमाणात चोरी झाल्याचे स्पष्ट होते. लाकूड लंपास करताना त्यांना काही स्थानिकांची मदत मिळते. स्थानिकांच्या मदतीशिवाय वृक्षतोड करणे आणि नंतर लाकूड लंपास करणे अवघड आहे.
साडेतीन वर्षांत सहा हजार वृक्षांची तोड
लाकूड तस्कर मोकळेच
अवैध वृक्षतोड आणि लाकूड तस्करीच्या घटनांमध्ये तस्कर हाती लागतच नाहीत. या प्रकारांमध्ये संशयितांचे वाहन हाती लागले तर तस्करांपर्यंत पोहोचणे शक्य होते. अपवादात्मक परिस्थितीत वाहन हाती लागते. न्यायालयात ही प्रकरणे गेल्यावर प्रचलित कायद्यानुसार संशयिताला म्हणजे ज्याच्याकडे लाकूड सापडले, त्याला त्या लाकडाची मालकी सिध्द करण्याची जबाबदारी असते. अनेकदा संशयित अशी मालकी सिध्द करू शकत नाही. यामुळे हे लाकूड शासन म्हणजे वन विभागाच्या मालकीचे होते, अशी माहिती या विभागाचे अधिकारी व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली.