सामाजिक उपक्रमात उद्योग समुहांनी जाणीवपूर्वक सहभागी व्हावे यासाठी केंद्र शासनाने ‘कॉपरेरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी’ अर्थात ‘सीसीआर’च्या माध्यमातून मांडलेल्या संकल्पनेला स्थानिक पातळीवरील उद्योगांकडून समाधानकारक प्रतिसाद लाभत आहे. बॉश, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, ग्लॅक्सो स्मिथलाईन, सीएट, स्लाईड वेल अशा कारखान्यांनी त्यात यशस्वी सहभाग नोंदवत आरोग्य, पर्यावरण संवर्धन, सुरक्षितता, शिक्षण आदी विषयांवर प्रभावीपणे काम करुन सामाजिक बांधिलकीचा नवीन पायंडा पाडला आहे.
‘सीसीआर’ म्हणजे औद्योगिक विश्वाची समाजाशी असणारी बांधिलकी. उद्योग व्यवसायात आपल्याला झालेल्या नफ्याचा काही भाग हा सामाजिक उपक्रमांसाठी वापरावा याकरिता केंद्रीय उद्योग मंत्रालयाने एक कायदा अस्तित्वात आणला. ज्यात एखाद्या कंपनीची वार्षिक उलाढाल ही १०० कोटी किंवा त्याहून जास्त असेल वा निव्वळ नफा पाच कोटीच्या घरात असेल अशा कारखान्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या उत्पन्नातील तीन टक्के रक्कम सामाजिक उपक्रमासाठी वापरावी, असा अंतर्भाव आहे. त्या दृष्टीने कारखान्यांनी सामाजिक प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, त्यांना हव्या असलेल्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम हाती घ्यावे अशी अपेक्षा आहे. शहर परिसरातील अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीमधून अनेक नामांकित कंपन्या ‘सीएसआर’च्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवित आहेत.
येथील महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राच्यावतीने आरोग्य व शिक्षण या क्षेत्राशी संबंधित उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या अंतर्गत ‘एचआयव्ही’बाधित व्यक्ती तसेच बालकांसाठी यश फाऊंडेशनचे काम सुरू आहे. एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्यांना एआरटी लिंक करून देणे, त्यांना आवश्यक शासकीय सवलती मिळवून देणे तसेच रोजगाराची साधने उपलब्ध करून देण्याचे काम या उपक्रमात सुरू आहे. या शिवाय, महिंद्राने इगतपुरी तालुक्यातील गोंदा येथे ४ ते ६ वयोगटातील बालकांसाठी अत्याधुनिक स्वरूपातील अंगणवाडी सुरू केली आहे. बॉश कंपनीने आरोग्य व पर्यावरण यावर लक्ष केंद्रीत केले आहे. कंपनीच्या सहकार्याने दरवर्षी होणारा ‘नाशिक रन’ हा उपक्रम सर्वश्रृत आहे.
औद्योगिक क्षेत्रातील ‘ग्लॅक्सोस्मिथ लाईन फार्मा’ देखील या उपक्रमात आघाडीवर आहे. या कारखान्याने ग्रामीण भागात आरोग्य सोयी सुविधा पुरविण्यासाठी ‘ग्रामीण विकास संस्था’ हा फिरता दवाखाना आदिवासीबहुल पेठ तालुक्यात सुरू केला आहे. फिरत्या दवाखान्यााच्या माध्यमातून १५० गावांमध्ये आरोग्य विषयक सुविधा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सिएट कंपनीने नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे. गुन्हेमुक्त नाशिकसाठी काम करणाऱ्या नाशिक पोलिसांच्या विविध सामाजिक उपक्रमात सिएटचा सहभाग आहे.
स्लाईड वेल मिल्युअर टेक्स कारखाना पाच वर्षांपासून मतीमंद मुलींसाठी काम करणाऱ्या घरकुल संस्थेसाठी काम करत आहे. औद्योगिक वसाहतीतील या कारखान्यांकडून सामाजिक बांधीलकीच्या कायद्याचा उद्देश प्रत्यक्षात आणला
जात आहे.