साधारणत: दहा वर्षांच्या कालखंडानंतर रेल्वेच्या प्रवासी भाडय़ात दरवाढ करण्यात आल्याच्या निर्णयाचे वेगवेगळे पडसाद उमटत असून महागाईच्या काळात ही दरवाढ असह्य होणार असल्याचे सर्वसामान्य प्रवाशांचे म्हणणे असले तरी या दरवाढीचे काही रेल्वे प्रवासी संघटनांनी स्वागत करून त्याचा रेल्वेची आर्थिक स्थिती सुधारण्यास लाभ होणार असल्याचे म्हटले आहे. रेल्वेने द्वितीय, शयनयान ते वातानुकूलीत श्रेणीच्या प्रवासासाठी ही दरवाढ केली आहे. या निर्णयाविषयी प्रवासी संघटनेचे पदाधिकारी व प्रवाशांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दात..

स्वागतार्ह निर्णय
प्रवासी भाडय़ात वाढ करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. गेल्या दहा वर्षांपासून रेल्वेमंत्री पदावर ज्या कोणी व्यक्ती आल्या, त्यांनी दरवाढ न करण्याचा पवित्रा स्वीकारून राजकीय लाभ पदरात पाडून घेतला. परंतु, रेल्वेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन द्यावे लागत असताना रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. याची परिणती रेल्वे आर्थिकदृष्टय़ा अडचणीत येण्यात होणार असून संबंधित मंत्र्यांनी दरवाढ करण्याचे जे धाडस दाखविले नाही, ते आताच्या रेल्वेमंत्र्यांनी दाखविले. हे कौतुकास्पद आहे. रेल्वेवर मोठा आर्थिक बोजा पडत असताना आजवरच्या रेल्वेमंत्र्यांनी हा निर्णय न घेता राजकीय स्वार्थ साधण्यात समाधान मानले. त्यांना रेल्वेशी कोणतेही देणेघेणे नव्हते. दरवाढ न करता उलट प्रवाशांवर सवलतींचा वर्षांव या काळात करण्यात आला. रेल्वेने केलेली दरवाढ अतिशय कमी प्रमाणात व आवश्यक होती.    
बिपीन गांधी, अध्यक्ष, रेल परिषद.

दरवाढ भरपूर,
पण सुविधा शून्य
दहा वर्षांत काँग्रेस शासनाने रेल्वेचा तोटा भरून काढण्यासाठी प्रथमच मोठय़ा प्रमाणात दरवाढ केली. परंतु, प्रवाशांना ज्या सुविधा व सुरक्षिततेची हमी पाहिजे, ती दिली जात नाही. अनेकदा स्थानकात व डब्यात प्रवाशांना टवाळखोरांच्या जाचाला तोंड द्यावे लागते. सुरक्षिततेची हमी मिळत नाही. ज्या रेल्वेगाडय़ा आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर होत्या, ती कुसुमाग्रज नाशिक-मुंबई एक्स्प्रेस रेल्वेने बंद केली. केवळ पंधरा दिवस ही गाडी चालविली. ही गाडी पुन्हा सुरू होणे आवश्यक आहे. दरवाढ केली असली तरी त्यानुसार प्रवाशांना सुविधा मिळणे आवश्यक आहे. दरवाढीत पॅसेंजर व दुसऱ्या वर्गातील प्रवाशांना दरवाढीची झळ बसणार आहे.
    – सुरेंद्रनाथ बुरड
अध्यक्ष, नाशिक जिल्हा प्रवासी संघटना

पासधारकांचा प्रवासही महागणार
नाशिक जिल्ह्यातून मुंबईला प्रवास करणारे हजारो पासधारक प्रवासी आहेत. पंचवटी, गोदावरी व राज्यराणी एक्स्प्रेससह कसारामार्गे उपनगरी गाडय़ांच्या माध्यमातून ते मुंबईला ये-जा करतात. पासधारकांसह हा प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांवर दरवाढ झाल्यामुळे अतिरिक्त बोजा पडणार आहे. रेल्वेने अनेक वर्षांपासून ही दरवाढ केली नव्हती. परंतु, सध्या महागाईच्या काळात ती प्रकर्षांने जाणवणार आहे. सध्या पासधारकांना महिन्याला सर्वसाधारणसाठी ४६० तर वातानुकूलीतसाठी १३०० हून अधिक रूपये लागतात. आता पासधारकांचा प्रवासही दरवाढीच्या निकषानुसार वाढू शकतो.
    – योगेश तांदळे
    रेल्वे प्रवासी.