* विलेपाल्र्यात मैफल रंगणार
* लतादीदींच्या हस्ते आशाताईंचा सत्कार
ज्येष्ठ पाश्र्वगायिका आशा भोसले यांच्या चतुरस्र गायकीची बरसात मुंबईतील रसिकांवर लवकरच होणार आहे. निमित्त आहे ते पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांचे. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनात आघाडीवर असणाऱ्या हृदयेश आर्ट्स या संस्थेने विलेपार्ले पूर्व येथील पार्ले टिळक विद्यालयाच्या प्रांगणात रविवार, ३१ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता आशा भोसले यांचा ‘नक्षत्रांचे देणे’ हा लोकप्रिय कार्यक्रम आयोजित केला आहे. या मैफलीत हृदयनाथही सहभागी होणार असून त्याचे निवेदन सुधीर गाडगीळ करणार आहेत.
हृदयनाथ यांच्या पंचाहत्तरीला म्हणजे गेल्या वर्षी २६ ऑक्टोबरला हा कार्यक्रम होणार होता. मात्र आशा भोसले यांच्या घरात घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. रविवारी होणाऱ्या या कार्यक्रमात आशा भोसले हृदयनाथांच्या गाण्यांव्यतिरिक्त सुधीर फडके, श्रीनिवास खळे, यशवंत देव, वसंत प्रभू, राम कदम आदी संगीतकारांच्या रचना सादर करणार आहेत. या संगीतकारांची वैशिष्टय़े, त्यांच्या कामाची पद्धत, त्यांच्यासोबतच्या आठवणी यालाही त्या उजाळा देणार आहेत. मुंबईत अनेक वर्षांनंतर हा कार्यक्रम होत असल्याने रसिकांसाठी ती मोठी पर्वणी ठरणार आहे.
स्वरसम्राज्ञीच्या हस्ते चतुरस्र गायकीचा गौरव
हृदयेश आर्ट्स या संस्थेतर्फे देण्यात येणारा हृदयनाथ पुरस्कार यंदा आशा भोसले यांना घोषित झाला आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार त्यांना स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या हस्ते याच कार्यक्रमात देण्यात येणार आहे. एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लाखो रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणाऱ्या कोणत्याही क्षेत्रातील नामवंताला हा पुरस्कार दिला जात असून आतापर्यंत लता मंगेशकर आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, अशी माहिती हृदयेशचे अविनाश प्रभावळकर यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 10th Mar 2013 रोजी प्रकाशित
मंगेशकरांचे गाणे, नक्षत्रांचे देणे!
ज्येष्ठ पाश्र्वगायिका आशा भोसले यांच्या चतुरस्र गायकीची बरसात मुंबईतील रसिकांवर लवकरच होणार आहे. निमित्त आहे ते पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांचे.

First published on: 10-03-2013 at 12:42 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Song of mangeshkar nakshtranche dene