* राजीव गांधी जीवनदायी योजनेचे लोकार्पण होणार
* पालकमंत्र्यांकडून कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा
राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी २१ नोव्हेंबरला नागपुरात येणार आहेत. या कार्यक्रमाची प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सोनियांच्या सभेला दीड ते दोन लाख लोक उपस्थित राहणार असल्यामुळे प्रशासनाला सुरक्षेच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिली.
या सोहळ्याच्या निमित्ताने पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या अध्यक्षतेखाली रविभवनमध्ये कार्यक्रमासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. राजीव गांधी जीवनदायी योजना आठ राज्यांत राबविल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता ही योजना राज्यात राबविणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यापूर्वीच जाहीर केल्यामुळे या योजनेचा समाजातील गोरगरीब जनतेला फायदा होणार आहे. या कार्यक्रमासाठी कस्तुरचंद पार्कवर तयारी सुरू आहे. एसपीजे पथक सोमवारी नागपुरात पोहोचले असून त्यांनी सभेच्या ठिकाणची पाहणी केली. कस्तुरचंद पार्कवर या कार्यक्रमासाठी नव्याने व्यासपीठ तयार केले जात असून त्यावर केवळ १५ मान्यवर बसतील अशी व्यवस्था राहणार आहे. मैदानात लोकांना बसण्यासाठी खुच्र्या न राहता भारतीय बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. ज्यांना खाली बसता येत नाही अशा निवडक लोकांसाठी खुच्र्याची व्यवस्था राहणार आहे. पार्किंगची व्यवस्था मैदानाच्या चारही बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत करण्यात आली आहे. बाहेरगावावरून येणाऱ्या गाडय़ा पटवर्धन मैदानावर ठेवण्यात येतील. सुरक्षेच्या दृष्टीने पार्कच्या भोवती किंवा मैदानात पार्किंग व्यवस्था ठेवण्यात आली नाही. त्यामुळे सभेच्या ठिकाणी येण्यासाठी लोकांना किमान एक ते दीड किलोमीटर पायी चालावे लागणार आहे. एक ते सव्वा तासाचा कार्यक्रम राहणार आहे. जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ ज्या रुग्णांनी घेतला त्यापैकी ५० रुग्णांची सोनिया गांधी भेट घेणार आहेत. त्या सर्व रुग्णांना सभेच्या ठिकाणी बोलविण्यात आले असून त्यांची व्यवस्था वेगळी करण्यात आली आहे. बुथ पातळीवर या मोहिमेची माहिती देण्यासाठी जनजागृती केली जात आहे. गर्दी जमविण्यासाठी कुठल्याही पदाधिकाऱ्यांवर बळजबरी करण्यात आलेली नाही, असे मोघे म्हणाले.
ऐतिहासिक असा हा कार्यक्रम असल्यामुळे लोक स्वयंस्फूतीने या कार्यक्रमाला येतील, असा दावा मोघे यांनी केला. सोनिया गांधी मध्यप्रदेशमधून दुपारी ३.३० च्या सुमारास नागपुरात आल्यानंतर त्या थेट कस्तुरचंद पार्कवर  येण्याची शक्यता आहे. मात्र, अजूनपर्यंत त्यांचा अधिकृत कार्यक्रम आलेला नसल्याचे मोघे यांनी स्पष्ट केले.  सोनिया गांधी यांचा मेडिकलमध्ये जाण्याचा कुठलाही कार्यक्रम नाही. बैठकीला खासदार विलास मुत्तेमवार, मुकुल वासनिक, अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक, शहर अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, एस. क्यू जमा, जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस आयुक्त के.के. पाठक आदी उपस्थित होते.

धोटेंच्या घोषणेत दम नाही -मोघे
विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांनी कार्यक्रम उधळून लावू अशी घोषणा केली असली तरी त्यांच्या घोषणेत काही दम नाही. सोनिया गांधी यांच्या सभेच्या निमित्ताने कस्तुरचंद पार्क आणि परिसरात व ज्या मार्गाने त्या येणार आहेत त्या मार्गावर पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांना सूचना देण्यात आल्याचे मोघे यांनी सांगितले.