पिंपळगाव खांड धरणाच्या निर्मितीमुळे मुळा नदी बारमाही करण्याचे स्वप्न या पावसाळय़ात निश्चितपणे पूर्ण होणार असल्याची ग्वाही आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी दिली. अन्नसुरक्षा योजनेचे श्रेय अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन घेणा-या देशातील शेतक-यांना असल्याचे त्यांनी सांगितले.
तालुक्यातील लहित खुर्द येथे राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत ग्रामीण नळपाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे होते.
मुळा नदीत सोडलेले पाणी या वर्षी घारगावपर्यंत पोहोचले. त्यामुळे मुळा परिसरातील शेतीचा पुढील दोन महिन्यांचा प्रश्न मिटला असल्याचे अगस्ती कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर यांनी सांगितले होते. योग्य नियोजनामुळे अवघ्या आठ दिवसांत पाणी सर्वांना मिळू शकल्याचे त्यांनी सांगितले. पाण्याचे योग्यप्रकारे नियोजन केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने या वेळी सहायक अभियंता किरण देशमुख यांचा या वेळी सत्कारही करण्यात आला.
या पार्श्र्वभूमीवर पिचड म्हणाले, पिंपळगाव खांड धरण कोणत्याही परिस्थितीत या वर्षी पूर्ण केले जाईल. या वर्षी मुळेचे एकच आवर्तन मिळाले, पण पुढील वर्षी किमान दोन ते तीन आवर्तने मिळू शकतील. पिंपळगाव खांडपर्यंतच्या धरणांचे पाणी वरच्या भागासाठी वापरले जाईल, तर पिंपळगाव खांडचे पाणी उर्वरित भागासाठी वापरले जाईल. त्यामुळे बारमाही मुळा नदीचे स्वप्न या पावसाळय़ात निश्चितपणे पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाण्याचा जपून वापर करण्याचा तसेच ठिबकचा वापर करण्याचा सल्ला त्यांनी शेतक-यांना दिला. ज्यांची क्षमता आहे, त्यांच्याकडून पैसे घेतले तर काय बिघडले असा सवाल करत त्यांनी टोलचे समर्थन केले. देशाचे कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मागील दहा वर्षांत शेतकरी हिताच्या विविध योजना राबविल्या, त्यामुळे देश अन्नधान्याच्या बाबतीत केवळ स्वयंपूर्णच झाला नसून अन्नधान्याची निर्यातही करू लागला आहे. त्यामुळेच देशात अन्नसुरक्षा योजना राबविणे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सुभाष गोडसे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.