दिवाळीच्या सणानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने सुरू केलेल्या नागपूर- पुणे या विशेष गाडीला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
नागपूर- पुणे मार्गावर दिवाळी व इतर सणांना प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. रेल्वेच्या नियमित गाडय़ांमध्ये आरक्षण तीन-चार महिने आधीच फुल्ल होते व एसटीच्या बसगाडय़ा अपुऱ्या पडतात. याचा गैरफायदा घेऊन खाजगी ट्रॅव्हल्सचे संचालक प्रवाशांची भरमसाठ लूट करतात. ही दरवर्षीची परिस्थिती लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने यावर्षी पुण्यासाठी दोन विशेष रेल्वेगाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला. यापैकी पहिली गाडी आज, शुक्रवारी नागपूरहून पुण्यासाठी रवाना झाली. हीच गाडी उद्या पुण्याहून सुटून नागपूरला परत येईल. रेल्वेने एरवी रिकामे पडून राहिले असते अशा गाडय़ांचे डबे उपयोगात आणून या विशेष गाडय़ा सुरू केल्या.  एरवी अशा गाडय़ांमध्ये गर्दी कमी असते, हा पूर्वीचा अनुभव पाहता या गाडय़ांनाही प्रतिसाद कसा मिळेल याची शंका होती. शिवाय १६ तारखेच्या गाडीत केवळ द्वितीय श्रेणी सिटिंग व वातानुकूलित चेअर कारद्वारे बसूनच पुण्यापर्यंत जाण्याची सोय असल्यामुळेही ही शंका कायम होती. परंतु १६ व १९ नोव्हेंबरला सुटणाऱ्या दोन्ही गाडय़ांना प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. सेकंड सिटिंगमध्ये १०२ टक्के, तर एसी चेअर कारमध्ये १३६ टक्के इतके प्रवाशांचे बुकिंग झाले, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश दीक्षित यांनी पत्रकारांना दिली.
१९ तारखेला सुटणार असलेल्या गाडीमध्ये प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना प्राधान्य देऊन १३ ते १६ तारखेपर्यंत आरक्षणाची सोय करण्यात आली होती. या जागा १०० टक्के भरल्या आहेत. शुक्रवारपासून या गाडीत इतर प्रवाशांसाठी आरक्षण सुरू करण्यात आले, तेही सकाळीच पूर्ण झाले. १८ तारखेपासून या गाडीत तत्काळ आरक्षण सुरू करण्यात येणार असून त्यालाही प्रतिसाद मिळेल, अशी आशा वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुमंत देऊळकर यांनी व्यक्त केली. तत्काळ कोटय़ात या गाडीत एसी थ्री टियरसाठी १६, तर शयनयान श्रेणीत २८८ जागा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.
सणांचा हा मोसम येत्या फेब्रुवारी- मार्च महिन्यापर्यंत राहील. प्रवाशांची प्रतीक्षा यादी लक्षात घेऊन यापुढेही गरज भासल्यास विशेष गाडय़ांची सोय करण्यात येईल. यावर्षीप्रमाणेच भविष्यातही पुण्यासाठी विशेष गाडय़ा चालवण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन दीक्षित यांनी दिले. त्यांनी हिरवा बावटा दाखवून नागपूर- पुणे ही विशेष गाडी रवाना केली.