शीव पनवेल महामार्गावरील खारघर टोल सुरू करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग न्यायालयाच्या निर्देशाकडे बोट दाखवीत आहे, मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे अर्धवट काम केलेल्या महामार्गावरुन पैसे भरून प्रवास करून जीव गमवायचे का असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. शीव पनवेल मार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम अर्धवट असतानाही सरकारी पळवाटा वापरून या मार्गाच्या टोलवसुलीचा न्यायहुकूम एसपीटीपीएल कंपनीने मिळविल्याने या मार्गावरील प्रवाशांना धोकादायक प्रवास टोलचे ३० रुपये भरून करण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षी या मार्गाचे काम सुरू असताना खारघर ते कळंबोली या चार किलोमीटरच्या अंतरावर ७० अपघात घडले. अजूनही अपघातवार सुरूच आहेत. काम अर्धवट असताना या मार्गाच्या टोलवसुलीला कशी परवानगी मिळते असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. कामोठे, खारघरच्या प्रवेशद्वारावर व रोडपाली उड्डाणपुलाखाली या कंपनीचे काम अर्धवट अवस्थेमध्ये आहे.
कामोठेमधून या मार्गाला येण्यासाठी मार्गच नाही. शीव पनवेल महामार्गावर येण्यासाठी धोकादायक मार्ग अवलंबून प्रवाशांना मार्ग गाठावा लागत आहे. अशीच अवस्था रोडपाली उड्डाणपुलाखालची आहे. तुर्भे व मानखुर्द येथेही कामे रखडलेली आहेत. महामार्गालगतच्या शौचालयांची कामे होणे शिल्लक आहेत. रस्त्याकडेला असणाऱ्या पदपथांची तर बोंब आहे. असा हा शीव ते कळंबोली महामार्गाचा सुमारे २८ किलोमीटर अंतरावरून वाहने सुसाट धावण्यासाठी प्रवाशांना १४ वर्षे ३० रुपये येताजाता खारघर व कामोठे येथे भरावे लागणार आहेत. काही स्थानिकांना सवलती असणारा हा प्रवास धोकादायक आहे. दोन दिवसांत सुमारे ७०० वाहनमालकांनी रोडपाली उड्डाणपुलाखालील एसपीटीपीएल कंपनीच्या केंद्रातून ईटीसी टॅग (स्थानिक वाहनमालकांना टोल सवलतीचा मिळणारा पास) मिळविला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर टोल भरून व सवलत घेऊन वाहनातील प्रवाशांनी प्राण धोक्यात घालावे का असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
एसपीटीपीएल कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उच्चपदस्थांकडून टोलवसुलीला गेल्या महिन्यामध्ये परवानगी मागितली होती. एसपीटीपीएल कंपनीने दिलेल्या विनंतीपत्रावर सार्वजनिक बांधकाम विभागातील उच्चपदस्थांनी त्यावर केलेल्या शेऱ्यांच्या आधारावर एसपीटीपीएल कंपनीने न्यायालयात धाव घेतली. २४ डिसेंबरला न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला १४ दिवसांत एसपीटीपीएल कंपनीला खारघर टोलवसुली सुरू करण्याविषयीचा निर्णय घ्यावा असे निर्देश दिल्यानंतर सावर्जजनिक बांधकाम विभागाने न्यायालयाच्या निर्देशावर बोट ठेवत अतिशय तत्परतेने ३ डिसेंबरला त्याबाबतची अधिसूचना जाहीर केली. मात्र याची वाच्यता कुठेही होऊ नये याचीही खबरदारी सरकारी पातळीवर व कंत्राटदार कंपनीने घेतली होती.

टोल सुरू होण्याची पूर्वसूचना
४ डिसेंबरला एसपीटीपीएल कंपनीचे प्रवक्ता उमेश सोनावणे यांच्याकडेही टोल ६ डिसेंबरला सुरू होणार आहे, याची चौकशी केली होती.  त्या वेळी सोनावणे यांनी आपल्याला याविषयी कोणतीच माहिती नाही, तसेच कोणतीही अधिसूचना आपल्याकडे आली नसल्याचे सांगितले होते. अखेर ६ डिसेंबरच्या रात्री सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना न्यायालयाच्या आदेशाच्या अवमानाची दाखल देत खारघर टोल सुरू करण्याच्या बातमीला दुजोरा दिला.  

सायन पनवेल टोल प्रा. लिमिटेड या कंपनीने शीव पनवेल मार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम ९८ टक्के पूर्ण झाल्यामुळे २ टक्के काम शिल्लक आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर हा टोल सुरू करण्याची अधिसूचना काढण्यात आली. पंचलिस्ट कामांपैकी रोडपाली, खारघर व कामोठे येथील व इतर काही ठिकाणी राहिलेल्या भागाचे काम टोल सुरू झाल्यापासून ६० दिवसांत करण्याचे कंपनीला अनिवार्य आहे. तसेच सीआरझेडच्या मंजुरीनंतर फेज २ मधील कामाला गती मिळेल. त्या वेळी तुर्भे व मानखुर्द येथील थांबलेली कामेही सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे एसपीटीपीएल कंपनीला बंधनकारक आहे.
    -रमशे आगवणे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग