दिवंगत यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीनिमित्त येथील श्री समर्थ अॅकॅडमीतर्फे येत्या शनिवारी (दि ५ ) श्रीमद् भगवद्गीता वाग्यज्ञ सोहळा आयोजित केला आहे. यात कराड शहर व परिसरातील १८ शाळांचे ५ हजार विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती, संयोजक प्रमुख डॉ. अंजली देसाई यांनी दिली. देसाई म्हणाल्या,‘‘छत्रपती शिवाजी स्टेडियमवर मुख्य कार्यक्रम होणार आहे. शनिवारी सकाळी ८ वाजता दत्त चौकातून गं्रथदिंडी निघणार आहे. ही दिंडी स्टेडियमवर पोहोचल्यानंतर वाग्यज्ञ सोहळा होणार आहे. स्टेडियमवर होणाऱ्या कार्यक्रमास राष्ट्रासंत भय्यू महाराज यांची प्रमुख उपस्थिती आहे. तर करवीर पिढीचे श्री शंकराचार्य विद्या नृसिंह भारती अध्यक्षस्थानी आहेत. निळकंठ शिवाचार्य धारेश्वरकर महाराजांचे सान्निध्य लाभणार आहे. शहर व परिसरातील १८ शाळांचे विद्यार्थी १८ अध्यायांचे पठण करणार आहेत. या वेळी मान्यवरांचे आशीर्वचनही होणार आहे. भारताच्या भावी पिढीकडून विविध योग, सुसंस्कार व संस्कृती यांची उजळणी व विश्वबंधुत्वाचा श्रीमद् भगवद्गीतेचा संदेश जनसामान्यापर्यंत नेण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्यामराव दळवी व भीमराव कणसे यांनी केले आहे.