महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यात प्रथमच २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात १५० स्टॉल राहणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके व संतोष नागरगोजे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
औसा रोडवरील कस्तुराई हॉल व मदानात हे प्रदर्शन भरवले जाणार आहे. कृषिक्षेत्रात दररोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. औजारे, बी-बियाणे, खते, कीटकनाशके यात अनेक बदल होत आहेत. तंत्रज्ञानात होणारे बदल थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे साळुंके म्हणाले.
दररोज दुपारी १२.३० ते २.३० या कालावधीत कृषी नवनिर्माण विचार मंचच्या वतीने शेतीवरील व्याख्याने ठेवण्यात आली आहेत. यात उद्योजक बी. बी. ठोंबरे, पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर, परभणी कृषी विद्यापीठातील प्रा. नितीन मरकडेय व शेतकरी नेते पाशा पटेल यांचे मार्गदर्शन होणार आहे.
हे प्रदर्शन सर्व शेतकऱ्यांसाठी विनामूल्य राहणार आहे. प्रदर्शनाच्या कालावधीत शेतकऱ्यांनी आणलेल्या मातीचे मोफत परीक्षण करून दिले जाणार आहे. दररोज दुपारी ३.३० ते ५.३० या कालावधीत ऊस, सोयाबीन, तूर, हरभरा, मूग, ज्वारी, सूर्यफूल इत्यादी पिकांच्या उत्पादनवाढीचे नवीन तंत्रज्ञान सांगणारी कृषी कार्यशाळा घेतली जाणार आहे. २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनसे राज्य परिवहन कामगार सेनेचे अध्यक्ष अविनाश अभ्यंकर उपस्थित राहणार आहेत. १ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या समारोप समारंभास आमदार बाळा नांदगावकर, मनसेचे सरचिटणीस अनिल शिदोरे व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर उपस्थित राहणार आहेत.
कृषी विभागाने पाठ फिरविली
मनसे कृषी प्रदर्शनाचे आयोजन करत असल्याचे निमित्त करून राज्य शासनाच्या कृषी विभागाने, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने व बाजार समित्या, पणन महासंघ यांनी या प्रदर्शनासाठी कोणतेही सहकार्य केले नाही. शेतकऱ्यांसाठीचे प्रदर्शन मनसे भरवत असेल, तर शासकीय यंत्रणेला मोफत स्टॉल उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली असतानाही आपला सहभाग न नोंदवणे चुकीचे असल्याचे अभय साळुंके म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 25th Nov 2013 रोजी प्रकाशित
मनसेतर्फे २७ नोव्हेंबरपासून पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यात प्रथमच २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

First published on: 25-11-2013 at 01:40 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State level agri exibition in parabhani by mns on 27 nov