शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावी, या मागणीसाठी येत्या १४ फेब्रुवारीला ‘काम बंद’ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र जाती जमाती कर्मचारी संघाचे राष्ट्रीय महासचिव आर.सी. अंभोरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
मेडिकलची स्थापना झाली तेव्हा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या ८२२ पदांना मंजुरी देण्यात आली. गेल्या ६० वषार्ंत मेडिकलमध्ये अनेक विभाग वाढले तसेच वार्डाची संख्याही वाढली, परंतु चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदामध्ये कुठलीही वाढ झाली नाही. उलट सेवानिवृत्त झाल्यानंतर ती पदे भरली गेली नाहीत. त्यामुळे आजच्या घडीला मेडिकलमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची ३७५ पदे रिक्त आहेत. यामुळे मेडिकलच्या स्वच्छतेचा व रुग्णसेवेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही पदे भरावी, यासाठी गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून शासनासोबत संघर्ष सुरू आहे.
याच मागणीसाठी १५ जुलै २०१३ रोजी कर्मचारी संघातर्फे उपोषण सुरू करण्यात आले होते. परंतु मेडिकल प्रशासनाने आश्वासन दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले. गेल्या एक वर्षांत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना निवेदने दिली. परंतु आश्वासनाशिवाय काहीही पदरी पडले नाही. त्यामुळे १३ फेब्रुवारीपर्यंत शासनाने निर्णय घेतला नाही तर १४ फेब्रुवारीला काम बंद आंदोलन करण्यात येईल. यानंतरही दखल घेतली नाही तर १५ फेब्रुवारीपासून उपोषण व आमरण उपोषण करण्यात येईल. काम बंद आंदोलन करणार असल्याची नोटीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री व नागपूरच्या पोलीस आयुक्तांना पाठवण्यात आल्याचेही अंभोरे यांनी सांगितले. मेडिकलमधील स्वच्छता बाह्य़स्त्रोताद्वारे करण्याचा विचार शासन करत आहे. याला आमचा विरोध आहे. कारण खासगीकरणामुळे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पिळवणूक होणार आहे. स्वच्छतेचे खासगीकरण झाल्यास त्याला आम्ही तीव्र विरोध करू, असेही ते म्हणाले.