राज्यातील परिचारिकांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपाच्या दुसऱ्या दिवशी विदर्भातील विविध शासकीय रुग्णालयांत रुणांचे हाल होत असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा परिचारिकांनी दिला आहे.
शहरातील मेडिकल, मेयो आणि डागा रुग्णालयातील परिचारिका कामावर नसल्याने त्याचा फटका रुग्णांना बसला. रुग्णालय प्रशसानाने रुग्णांच्या सेवेसाठी प्रशिक्षणार्थी परिचारिका आणि डॉक्टरांची विविध वार्डामध्ये व्यवस्था केली असली तरी ते रुग्णांना सेवा देण्यात कमी पडत असल्यामुळे अनेक रुग्णांनी नाराजी व्यक्त केली. संघटनेने आजही रुग्णालय परिसरात निदर्शने करून सरकारचे लक्ष वेधले. परिचाराकांच्या संपामुळे मेडिकल, मेयो आणि डागा रुग्णालयातील ४० पेक्षा अधिक शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. दरम्यान,  सरकारने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
शासकीय परिचारिकांनी प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला असून दुसऱ्या दिवशी कोणीही कामावर गेले नाही. दुसऱ्या दिवशी राज्यात २३ हजार तर विदर्भात ११ हजार परिचारिका संपात सहभागी झाल्याचा दावा महाराष्ट्र गव्‍‌र्हमेर्ंट विदर्भ नर्सेस संघटनेने केला आहे. अन्य कर्मचारी संघटनांनी पाठिंबा जाहीर केल्याने परिचारिकांच्या संपाला आणखी बळ मिळाले आहे.
या संपामध्ये नागपुरातील मेडिकल, मेयो आणि डागा रुग्णालयातील १६९५ पैकी १५०० परिचारिका संपात सहभागी झाल्या आहेत. डागा रुग्णालयांमध्ये परिचारिका नसल्यामुळे रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांना आणि डॉक्टरांना कामावर बोलविण्यात आले आहे. रुग्णालय प्रशानाने परिचारिका संघटनेला नोटीस जारी करून कामावर रुजू होण्याचे आदेश दिले. मात्र, परिचारिका संपावर कायम असल्याने रुग्णालय प्रशासनाने राज्य सरकारला त्या संदर्भात कळविले आहे. डॉक्टरांचे अर्धे काम परिचारिका करीत असल्यामुळे अनेक डॉक्टरांना त्याचा फटका बसला. मेडिकमध्ये अनेक आकस्मिक विभागात परिचारिका नसल्यामुळे अनेक रुग्णांवर वेळीच उपचार केले जात नसल्याचे दिसून आले. आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही, तोपर्यंत हा बेमुदत संप सुरूच राहणार असल्याची माहिती विदर्भ नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्ष कल्पना विंचूरकर यांनी दिली. संघटनेच्या पदाधिकारी मुंबईला चर्चेसाठी गेल्या आहेत. मात्र, आज त्यावर काही तोडगा निघाला नाही.