ध्वज फाडून त्याची विटंबना केल्याप्रकरणी समाजकंटकांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी तसेच घटनेच्या निषेधार्थ बुधवारी पुकारलेल्या नळदुर्ग शहर बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जळकोट व अणदूर येथेही बुधवारी ‘बंद’ पाळण्यात आला. या वेळी आयोजित निषेध सभेला शहरातील नागरिकांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावली.
नळदुर्ग शहरापासून जवळच असलेल्या अलियाबाद शिवारात ‘आपलं घर’समोरील बाजूस श्री वीरभद्रेश्वर देवस्थानचे पुरातन मंदिर आहे. दरवर्षी २५ जानेवारीला या ठिकाणी यात्रेनिमित्त महापूजा व महाअभिषेक करण्यात येतो. येथे दर्शनासाठी भाविक मोठय़ा संख्येने येत असल्याने मंदिर परिसराचे सुशोभिकरण करून ध्वजही लावला जातो. २५ जानेवारीला जुना ध्वज काढून नवीन ध्वज उभारण्यात आला. मात्र, सोमवारी काही समाजकंटकांनी हा ध्वज फाडून त्याची विटंबना केली. या घटनेच्या निषेधार्थ येथील एका गटाने ‘बंद’ची हाक दिली होती. त्यानुसार बुधवारी शहरात उत्स्फूर्त ‘बंद’ पाळण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी शर्मिष्ठा घारगे, तसेच नायब तहसीलदार एन. बी. जाधव यांना निवेदन देण्यात आले. हे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. तुळजापूर तालुक्यातील जळकोट व अणदूर येथेही या घटनेच्या निषेधार्थ ‘बंद’ पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी दिवसभर दुकाने बंद ठेवली.
नळदुर्ग येथील भवानी चौकात सकाळी आयोजित निषेध सभेला नगराध्यक्ष शहेबाज काझी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक कमलाकर चव्हाण, नगरसेवक संजय बताले, नितीन कासार, सचिन डुकरे, अमृत पुदाले, मनसेचे ज्योतिबा येडगे, शिवसेना शहरप्रमुख संतोष पुदाले, भाजपचे शहराध्यक्ष पद्माकर घोडके, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रा. जावेद काझी, कुलस्वामिनी सूतगिरणीचे संचालक अख्तर काझी, अजहर जहागिरदार आदी उपस्थित होते. दरम्यान, झेंडा प्रश्नावरून नळदुर्ग शहरात तणावाची स्थिती निर्माण झाल्याने नगरपालिका प्रशासनाने शहरातील ज्या ज्या ठिकाणी ध्वज लावले आहेत, ते बुधवारी काढून घेतले. ‘बंद’ काळात चोख बंदोबस्त होता.
ध्वज विटंबनाप्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी सय्यद गौस अय्याज रझवी व सय्यद मस्तान ताहेरअली (नळदुर्ग) या दोघांना बुधवारी दुपारी ताब्यात घेतले.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jan 2014 रोजी प्रकाशित
नळदुर्गसह अणदूर, जळकोटला ‘बंद’
ध्वज फाडून त्याची विटंबना केल्याप्रकरणी समाजकंटकांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी तसेच घटनेच्या निषेधार्थ बुधवारी पुकारलेल्या नळदुर्ग शहर बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जळकोट व अणदूर येथेही बुधवारी ‘बंद’ पाळण्यात आला.
First published on: 30-01-2014 at 02:20 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strike in andur jalkot with naldurg