रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत गुरूवारी शहरात शालेय विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली.विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर वाहतूक नियंत्रण विभागाच्यावतीने फॅन्सी नंबर, मोबाईलवर बोलणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम उघडण्यात आली. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत गुरूवारी वाहतूक नियंत्रण विभागाच्यावतीने प्रबोधन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये विविध शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, तसेच एम.सी.सी.,आर.एस.पी.चे विद्यार्थी गणवेशासह सहभागी झाले होते.
भवानी मंडपातून रॅलीला सुरूवात झाली. महापौर जयश्री सोनवणे,प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी राजेंद्र मदने यांनी ध्वज दाखविल्यानंतर रॅलीला सुरूवात झाली.     मुख्यमार्गाने फिरून रॅली दसरा चौकात आली. तेथे विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. वाहतूकनियंत्रण विभागाचे पोलीस निरीक्षक खंडेराव खैरे यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांचे पालन कसे करायचे,या विषयाची माहिती दिली.