‘मला शाळेत जायला भीती वाटते’, ‘तुम्ही कसे आहात.. आम्ही सर्व ठिक आहोत, शाळेत बक्षिस समारंभाचा कार्यक्रम आहे. तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून याल?’, ‘आईने मला आई बोलायला शिकवले पण बाबा म्हणायला नाही शिकवले, असे का? याचे उत्तर आता तुम्ही द्या..’ या लाडीक तक्रारी आणि प्रश्न आहेत राज्यातील इयत्ता चौथी ते १२ वीतील विद्यार्थ्यांचे. त्यास निमित्त ठरले, कोल्हापूर येथील ज्येष्ठ रंगकर्मी संजय हळदीकर यांच्या संकल्पेतून राबविलेल्या ‘पंतप्रधानांना पत्र’ या प्रदर्शनाचे. नानाविध विषयांवर विद्यार्थ्यांनी मांडलेली मते अनुभविण्याची संधी नाशिककरांना प्रदर्शनाच्या निमित्ताने उपलब्ध झाली आहे.
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वावरताना ‘पत्र’ हा घटक मागे पडला आणि संवादाचे हक्काचे माध्यम म्हणून ‘भ्रमणध्वनी’ वापरण्याकडे अनेकांचा कल दिसतो. मात्र, पत्राची जुजबी ओळख करून देतांनाच विद्यार्थ्यांच्या मनातील स्पंदने, त्यांचे भावविश्व, त्यांच्या आपल्याविषयी असणाऱ्या तक्रारी, नातेसंबंधासहित आजच्या शिक्षणपध्दतींबाबत त्यांची असणारी मते या विषयी जाणून घेण्यासाठी हळदीकर यांनी दोन वर्षांपासून मुलांना ‘पंतप्रधानांना पत्र’ हा विषय दिला. नाशिक, कोल्हापूर, लोणावळा, कर्जत असे राज्यात ठिकठिकाणी झालेल्या कार्यक्रमातून त्यांनी ३५० पत्रे जमविली. त्याचे संकलन करत त्यातील ४२ निवडक पत्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. पत्रात आपली शाळा, अभ्यासक्रम, शिक्षक, परीक्षा याविषयी मुलांनी आपले विचार मांडले. आठवीपर्यंत परीक्षेशिवाय मुलांना उत्तीर्ण करणार आणि इयत्ता १० वीमध्ये गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार नाही, याबद्दल विद्यार्थ्यांनी पत्रात प्रामुख्याने तक्रार केली आहे. याचे समर्थन पण अगदी मोजक्या शब्दात करताना मुलांनी परीक्षा पध्दतीविषयी सांगितले. परीक्षा न घेता उत्तीर्ण झाल्यामुळे आम्हाला परस्परांना कमी गुण मिळाले म्हणून चिडवताही येत नाही तर गुणवत्ता यादीमुळे आपण नेमके कुठे आहोत हे समजते.. याबाबतचा आमचा अधिकार हिरावून घेतल्याची खंतही काही जणांनी स्पष्टपणे मांडली आहे.
आजच्या शिक्षण पध्दतीविषयी निर्भिडपणे बोलताना चिमुरडय़ांनी चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. त्यात अनेकांचे म्हणणे आहे. शिक्षक वर्गावर येतात आणि पुस्तक वाचुन निघून जातात. बाई वर्गात येतात, आम्हाला दंगा केला म्हणून ओरडतात. पण त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही, अशी प्रांजळ कबुलीही विद्यार्थ्यांनी पत्राद्वारे दिली. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आवडीचे शिक्षण घेता येत नाही. यामुळे बरेच मित्र हॉटेलमध्ये ‘वेटर’ म्हणून काम करतात, अशी खंतही काही जणांनी व्यक्त केली. पंतप्रधानांनी झाडे लावली पाहिजेत, असा सल्ला देण्यास चिमुरडे विसरलेले नाहीत. पाठीवरच्या वाढत्या ओझ्यामुळे शरीराला कशी इजा पोहचते, याचे नेमके वर्णन अनेकांनी केले आहे. आजची शिक्षणपध्दती कालबाह्य झाली असून त्यात बदल होण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
गंगापूर रस्त्यावरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्रात आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन कोषाध्यक्ष विश्वास ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. निवडक अशा १५० पत्रांचे संकलन करत त्याची पुस्तिका प्रकाशित करून पंतप्रधानांना पाठविण्यात येणार असल्याचे हळदीकर यांनी सांगितले. १९ मेपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या कालावधीत हे प्रदर्शन विद्यार्थी, पालक व नागरिकांसाठी खुले राहणार आहे.