घरातून बालपणापासून होणारे संस्कार हेच प्रत्येकाला यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवित असतात. कष्ट, मेहनत, जिद्द आणि सचोटी या चतुसुत्रीचा आधार घेऊन प्रवास केला तर जीवनात हमखास यश मिळते, असे प्रतिपादन विको लॅबोरेटरिजचे अध्यक्ष गजानन पेंढरकर यांनी रविवारी येथे केले. 
रोटरी क्लब डोंबिवलीतर्फे वैद्यकीय, क्रीडा, शिक्षण, पत्रकारिता क्षेत्रातील गुणवंतांना व्यावसायिक गुणवत्ता श्रेष्ठता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमाला क्लबचे अध्यक्ष शंकर साठवणे, सचिन गंधे, अद्वैत कवठेकर उपस्थित होते. जगात काहीही वाईट नसते. ते घडविणारा माणूस कसा आहे त्यावर बरेच काही अवलंबून असते असे सांगून उद्योजक पेंढरकर यांनी आपल्या उद्योगजगतामधील सुरुवातीची आव्हाने, त्यावर केलेली मात आणि नंतरचे यश यावर भाष्य करून खडतर मार्गाशिवाय यश शक्यच नाही. वडिलांची करडी शिस्त आपणास सामाजिक सेवेचे धडे देऊन गेली त्यामधून डोंबिवलीत पेंढरकर महाविद्यालयाची उभारणी झाली, असेही त्यांनी सांगितले.
शंकर साठवणे यांनी क्लबने राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी क्रीडा प्रशिक्षक राजन धोत्रे, दिपाली काळे, डॉ. मिलिंद पाटील, डॉ.बिजॉय कुट्टी यांचा सन्मान करण्यात आला.