रविवारी विशेष सत्कार सोहळा
‘इंडियन आयडॉल ज्युनियर’ स्पर्धेमुळे संपूर्ण देशाची आवडती झालेली नागपूरची चिमुकली गायिका सुगंधा दातेने नागपुरात आगमन झाल्याबरोबर सर्वाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. नागपूरकरांच्या पाठिंब्यामुळेच अंतिम पाच स्पर्धकांमध्ये स्थान मिळवता आले, असे सुगंधाने पत्रकारांशी बोलताना सांगितले.
 सुगंधा दातेच्या कामगिरीबद्दल धरमपेठ शिक्षण संस्थेद्वारे संचालित आविष्कार कला अकादमीने तिचा सत्कार आणि संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. वसंतराव देशपांडे सभागृहात रविवार, ८ सप्टेंबरला संध्याकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होईल. आविष्कार अकादमीचे संचालक, महागायक अनिरुद्ध जोशी आणि रसिका जोशी यांची ती शिष्या आहे.  या संगीतमय कार्यक्रमाची संकल्पना व संयोजन अनिरुद्ध जोशी यांचे आहे. सुगंधा दाते, अनिरुद्ध जोशी व रसिका जोशी कार्यक्रमात गाणी सादर करणार असून निवेदन श्वेता शेलगावकर हिचे राहील. ‘इंडियन आयडॉल ज्युनियर’ मध्ये वयाने सर्वात कमी असलेली सुगंधा दाते अंतिम पाच स्पर्धकांमध्ये पोहोचली होती. अनिरुद्ध आणि रसिका जोशी यां त्यांनी तिची खास तयारी करून घेतली होती. रविवारचा कार्यक्रम नि:शुल्क असून कार्यक्रमाच्या प्रवेशिका आविष्कार कला अकादमी, तिसरा माळा, धरमपेठ कला-वाणिज्य महाविद्यालय, धरमपेठ येथे संध्याकाळी  ४ ते ७ यावेळातच उपलब्ध राहणार आहे. अधिक माहिती करिता ८००७४७०२२२ किंवा ९४२२८२३७२३ यावर संपर्क साधता येईल.