ऋतिक रोशनची मुख्य भूमिका असलेला ‘क्रिश-३’ या चित्रपटाची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. या चित्रपटाचे खास वैशिष्टय़ म्हणजे, कंगना राणावत आणि विवेक ओबेरॉय हे दोघेही खलनायक म्हणून पाहता येणार आहेत. कंगनाने या चित्रपटासाठी कपडेपटांवर खास मेहनत घेतलेली असुन, या चित्रपटासाठी असलेला कपडेपट खास तिच्या भूमिकेला अनुसरुन आहे. यामध्ये तिने सुपरवुमनची भुमिका वठवली असून, खास याकरता गेविन मिग्युल या ड्रेस डिझाइनरने तिच्यासाठी कपडेपट तयार केला आहे. याकरता गेविनची टीम तिच्या कपडय़ांपासुन ते तिच्या केशभुषेवर काम करण्यात मग्न आहे.
कंगना राणावतने या चित्रपटासाठी घातलेला ड्रेस खास एका ठराविक रबरापासुन बनवलेला आहे. काळ्या रंगाच्या या रबराच्या ड्रेसचे वजन तब्बल ४ किलो असून, हा ड्रेस अंगावर चढवण्यासाठी लागणारा वेळ हा तब्बल तीन तासांचा आहे. हा ड्रेस डिझाइन करण्यासाठी गेविनने वापरलेले रबर हे परदेशातुन आणले असुन, हे रबर सर्वात आधी वितळवुन मग त्याच्यापासुन छोटे भाग तयार करण्यात आले आहेत. हे रबराचे भाग शिवण्यासाठी लागणारा दोराही परदेशातुनच आलेला आहे. हा अशा प्रकारचा ड्रेस, मेकअप आणि हेअरस्टाइल हे सर्व नवीन आणि अनोखे असल्याचे मत कंगनाने व्यक्त केले आहे. तसेच तिच्यामते बॉलीवुडमधील सुपरवुमनचा हा लुक सर्वानाच आवडेल अशीही खात्री तिने व्यक्त केलेली आहे.