दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन टोळ्यांना शस्त्रास्त्रांसह पोलिसांनी अटक केली. शहरातील गुन्हेगारीचे सत्र वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवरर, पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली आहे. शहरातील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर शहरात गुन्हेगारी मंडळींनी डोके वर काढण्यास सुरूवात केल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू झाली असताना गुन्हेगारीत होणारी वाढ परवडणारी नाही. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी गुन्हेगारी घटनांना लगाम घालण्यासाठी प्रमुख रस्त्यांवर वाहनांची तपासणी आणि रात्रीच्या गस्तीत वाढ केली आहे. पंचवटी पोलीस ठाण्याचे पथक कलानगर भागात गस्त घालत असताना टोळके संशयास्पदपणे फिरताना आढळले. संबंधितांची झडती घेतली असता त्यांच्याकडे कोयता, नायलॉन दोरी, मिरची पूड आणि धारदार शस्त्र आढळून आली. सोनू सुकदेव पवार, धर्मा खोडे, संजय दळवी यांना ताब्यात घेत असताना दोन संशयित फरार झाले. वैद्यनगर भागातही दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळक्याला जेरबंद करण्यात आले. जनरल वैद्यनगर भागात सहा ते सात संशयितांचे टोळके संशयास्पदपणे फिरत होते. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता तीन संशयित ताब्यात आले तर त्यांचे दोन साथीदार पळून गेले. मोटारसायकल, लोखंडी हत्यार, मिरचीची पूड त्यांच्याकडे आढळून आली. या प्रकरणी शंकर शिंदे, गणेश रॉय, अमर झिमर यांना अटक करण्यात आली तर सलीम शेख व असिफ उर्फ ढेऱ्या शेख हे फरार आहेत. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.